esakal | मंत्री झाल्यावरही आदित्य ठाकरे दोन कंपन्यांचे भागीदार होते, किरीट सोमय्यांचा नवा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री झाल्यावरही आदित्य ठाकरे दोन कंपन्यांचे भागीदार होते, किरीट सोमय्यांचा नवा आरोप

पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मंत्री झाल्यावरही 100 दिवस दोन खासगी कंपन्यांचे मॅनेजिंग पार्टनर होते - सोमय्या 

मंत्री झाल्यावरही आदित्य ठाकरे दोन कंपन्यांचे भागीदार होते, किरीट सोमय्यांचा नवा आरोप

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई, ता. 19 : पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मंत्री झाल्यावरही 100 दिवस दोन खासगी कंपन्यांचे मॅनेजिंग पार्टनर होते. ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमांचा हा भंग असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. तर रश्मी उद्धव ठाकरे यांची कर्जत तालुक्याखेरीज अन्य कोठे जमीन आहे का, असा प्रश्नही सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना विचारला. 

हिबिस्कस फूड कंपनीत आदित्य आणि रश्मी ठाकरे हे भागीदार (पार्टनर) होते. आदित्य 26 एप्रिल 2015 रोजी या कंपनीचे भागीदार झाले. त्यांनी 31 मार्च 2020 रोजी भागीदार म्हणून राजिनामा दिला. एलोरा सोलरमध्येही आदित्य हे भागीदार होते. ते 14 जुलै 2015 रोजी एलोरामध्ये भागीदार झाले व 31 मार्च 2020 रोजी त्यांनी या कंपनीतूनही राजिनामा दिला. मात्र आदित्य यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती व त्यांनी 31 मार्च 2020 रोजी कंपन्यांचे भागीदार म्हणून राजिनामा दिला. मात्र राजीनामा देईपर्यंत ते कंपन्यांचे भागीदार होते, हा ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमांचा भंग नाही का, यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : "चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

आदित्य ठाकरे यांचा नेमका व्यवसाय काय, त्यांची त्या व्यवसायातील नेमकी भूमिका काय याचेही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशीही मागणी सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना पत्नी रश्मी ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील वैजनाथ गावी (ता. कर्जत) दोन जमिनी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मात्र तपशीलात त्या दोनही जमिनींचे सारखेच सर्व्हे नंबर असल्याचे त्यात लिहिले होते. याचा अर्थ रश्मी ठाकरे यांची महाराष्ट्रात दुसरी कोणती जमीन आहे का, असेही त्यांनी विचारले आहे. 

उद्धव ठाकरे यांचा जमिनीचे व्यवहार करण्याचा व्यवसाय आहे का, असे असेल तर ते लपविण्याचा प्रयत्न का केला जात आहे, कोणा बिल्डरबरोबर आपली भागीदारी आहे का, आपण बिल्डिंग कंत्राटदार आहात का, आदित्य ठाकरे यांची ठाण्यातील अजय अशर बिल्डर बरोबर भागीदारी आहे का, अशा प्रश्नांची फैरही सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर झाडली आहे. या प्रश्नांची उत्तर आम्हाला तुमच्याकडून मिळत नाहीत. मात्र तुमचा व अन्वय नाईक यांचा संबंध काय हा प्रश्न मी विचारला तर मला जेलमध्ये टाकण्याची भाषा तुम्ही का करता, असेही सोमय्या यांनी विचारले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

new allegation by bjp leader kirit somayya on aaditya thackeray and rashmi thackeray

loading image