वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना राज्य शासनाचा “ज्ञानोबा-तुकाराम” पुरस्कार 

टीम इ सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2016-17 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना आज येथे घोषित करण्यात आला.

मुंबई:    राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2016-17 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना आज येथे घोषित करण्यात आला.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये 5 लाख रूपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.   यापूर्वी रा.चिं.ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ.यु.म.पठाण, प्रा.रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी मंत्री, सांस्कृतिक कार्य विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड आणि सय्यदभाई आदी सदस्यांच्या समितीने काम पाहिले.

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1934 रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवध्या 9 व्या वर्षापासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरु केली. प्राथमिक शिक्षणा बरोबर त्यांना संत साहित्याची विशेष आवड असल्याने त्यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. 1954 ते 1958 या काळात त्यांनी साखरे महाराज मठात श्री गुरु निलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. पुढे 1992 पर्यंत त्या काळातील थोर पंडित संत महात्मे, ह.भ.प.परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदि संत महात्मांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास करुन चार्तुमासामध्ये 60 वर्षापासून त्यांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालू आहे. ʻविठ्ठल कवचʼ, ʻविठ्ठल सहस्त्रणामʼ, ʻविठ्ठल स्तवराजʼ, ʻविठ्ठल अष्टोत्तरनामʼ, ʻविठ्ठल हृदयʼ, ʻमुक्ताबाई चरित्रʼ, ʻज्ञानेश्वर दिग्विजयʼ, ʻवाल्मिकी रामायणʼ, ʻसंत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमनʼ अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन, प्रवचनाव्दारे मानवतावादी सेवा अखंड सुरु असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधकांनी शास्त्राचा अभ्यास करुन राष्ट्र जिर्णोद्धराचे कार्य करीत आहेत.

Web Title: new award by govt esakal news