नव्या अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

रस्ते, पर्जन्य जलवाहिन्यांवरील तरतूद निम्म्याने कमी होण्याची शक्‍यता

रस्ते, पर्जन्य जलवाहिन्यांवरील तरतूद निम्म्याने कमी होण्याची शक्‍यता
मुंबई - रस्ते आणि नालेसफाई गैरव्यवहारांच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 29) सादर होणाऱ्या पालिकेच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्यांची तरतूद निम्म्याने कमी होण्याची शक्‍यता आहे. जकात रद्द झाल्यास अर्थसंकल्प 32 हजार कोटींवर येण्याची शक्‍यता आहे; मात्र नव्या अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांचा समावेश होणार आहे. भाजप व शिवसेनेतील वादाचा परिणाम नव्या अर्थसंकल्पावर होण्याची शक्‍यता असून भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी आयुक्तांच्या माध्यमातून नव्या प्रकल्पांना कात्री लावल्याचे समजते.

जकात रद्द होणार असल्याने नव्या आर्थिक वर्षात महसुलाचे नियोजन करण्यासाठी काटकसरीची उपाययोजना करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. रस्ते आणि नालेसफाई गैरव्यवहारांच्या पार्श्‍वभूमीवर रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या आर्थिक तरतुदींनाही कात्री लावली जाण्याची शक्‍यता आहे. "ब्रिमस्टोवॅड' या प्रकल्पासाठी सुमारे 3500 कोटींची तरतूद होते. रस्त्यांसाठीही चार हजार 400 कोटींची तरतूद गेल्या वर्षी करण्यात आली होती. यंदा ती कमी होण्याची शक्‍यता आहे. अनेक जुने प्रकल्प पुन्हा अर्थसंकल्पात नव्याने येणार असून जुन्या अर्थसंकल्पाला नवीन मुलामा देण्यात येईल अशी शक्‍यता आहे. पाणीपुरवठा प्रकल्पावर या वेळीही भर देण्यात येणार आहे.

24 तास पाणीपुरवठा करण्याची योजना बारगळली आहे. ती पुन्हा अर्थसंकल्पात येणार आहे. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण आणि डांबरीकरण, "ब्रिमस्टोवॅड'अंतर्गत करण्यात येणारी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे तसेच रुग्णालये, उद्यानांचा विकास आदी जुन्याच प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार आहे. कोस्टल रोड आणि रेसकोर्सचे "थीम पार्क' हे प्रकल्प शिवसेनेचे ड्रीम प्रोजेक्‍ट आहेत. हे प्रकल्प पुन्हा अर्थसंकल्पात असतील. भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादाचा परिणाम अर्थसंकल्पावर होण्याची शक्‍यता असून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने आयुक्तांच्या माध्यमातून प्रकल्पांना कात्री लावल्याचे समजते.

हे जुनेच प्रकल्प नव्याने येतील
मध्य वैतरणावर जलविद्युत प्रकल्प
कोस्टल रोड
पवई तलावाचे सुशोभीकरण
राणीची बाग, उद्याने, मैदानांचा विकास
दमणगंगा - पिंजाळ प्रकल्प
गारगई, शाई, काळू प्रकल्प
चौपाट्यांचा विकास
सफाई कामगारांसाठी आश्रय योजना
शाळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी, कॉम्युटर लॅब, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल क्‍लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा रुग्णालयाचा विकास आणि दर्जोन्नती
मिठी नदी ब्रिमस्टोवॅड
उड्डाणपुलांची बांधणी आणि दुरुस्ती
रेसकोर्सवरील थीम पार्क

Web Title: new budget old project