Inside Story : नवी दिल्लीतील तबलिगी जमातचं महाराष्ट्र कनेक्शन...

Inside Story : नवी दिल्लीतील तबलिगी जमातचं महाराष्ट्र कनेक्शन...

मुंबई - नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमात मेळाव्यात परदेशांतून आलेल्या व्यक्तींकडून कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. त्या मेळाव्याला महाराष्ट्रातील किमान 500 जण दोन ते चार दिवस उपस्थित असावेत, असा अंदाज आहे. या सर्व व्यक्तींना शोधून तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. 

दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्यामुळे प्रशासन हवालदिल झाले आहे. या बैठकीनंतर गावोगावी पांगलेल्या मंडळींचा शोध घेण्याचे काम महाराष्ट्र पोलिस केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने करत आहे. या परिषदेसाठी परदेशांतून मुंबईत आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, हे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे.

देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, नव्या घडामोडींमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. तबलिगी जमातसाठी होणाऱ्या गर्दीत 1988 नंतर मोठी वाढ झाली आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या हज यात्रेकरूंच्या खालोखाल असल्याचे सांगितले जाते. 

15 जणांचे वाशीत वास्तव्य 

तबलिगी जमातला हजर राहण्यासाठी फिलिपिन्सहून आलेले 15 जण 3 मार्चला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. काही आप्तांना भेटून ही मंडळी तबलिगीच्या नवी मुंबईतील वाशी येथील नूर मंझिल कार्यालयात गेली. दोन दिवसांनी, 5 मार्चला हा गट महाराष्ट्रातील काही जणांसह मुंबई सेंट्रल-निझामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला गेला. त्यानंतर 10 मार्चला हे सर्व जण नूर मंझिल येथे परत आले. या गटातील एकाला न्यूमोनियाची लक्षणे दिसत असल्याने मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवसांनी या रुग्णाचे निधन झाले. हा रुग्ण कोणाला भेटला होता, याची माहिती घेतली जात आहे. या गटातील आठ जणांना मदनपुरा येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

53 जणांची तपासणी; 15 अतिधोका पातळीवर 

आरोग्य विभागाने तबलिगी समाज कार्यालयाशी संबंधित 53 जणांची तपासणी केली असून, त्यापैकी 15 जण अतिधोक्‍याच्या पातळीतील आहेत. तिघे जण कोरोनाग्रस्त असल्याचेही नवी मुंबईतील सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील मेळाव्यानंतर अनेक जण नगर, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांत परतले आहेत. नगरला परत गेलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वस्तीच्या पाहणीसाठी मंगळवारी गेलेल्या आरोग्य पथकाला परत पाठवण्यात आल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जामखेड आणि परभणीत काही संशयित रुग्ण आढळले असून, चंद्रपूर येथील एक जण अत्यवस्थ आहे. केंद्र सरकारने या मेळाव्यातील सहभागी व्यक्तींना शोधण्याचे आदेश दिल्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि आसाम या राज्यांच्या मुख्य सचिवांनी संबंधितांना तपासणी करून घेण्याचे आवाहन ट्‌विटरवरून केले. महाराष्ट्र पोलिसांनीही असे आवाहन केले आहे. 

राज्यापुढे मोठे आव्हान 

देवबंद मुस्लिम समुदायातील तबलिगी मंडळी 100 वर्षांपासून धर्मप्रसाराचे काम करतात. या जमातीच्या प्रमुखांना अमीर म्हणतात. या संदर्भात मंगळवारी (ता. 31) महाराष्ट्रातील अमिरांशी संपर्क साधला. मरकाझ निझामुद्दीन यांनी दिल्लीतील मशिदीचे पूर्णत: विलगीकरण करण्याची तयारी दाखवल्याचे नमूद केले; परंतु 22 मार्चला झालेल्या तबलिगी जमातच्या तब्बल 10 दिवस आधीपासून परदेशांतील व्यक्ती महाराष्ट्रात आले होते. त्यांनी कोणत्या ठिकाणांना भेट दिली, हे तपासणे आव्हानात्मक आहे. यासंदर्भात काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

new delhis tabligi jamats maharashtra connection of spreading pandemic covid19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com