मुंबईत खड्ड्यांवर यंदा नवा 'प्रयोग'!

समीर सुर्वे
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांवर यंदाही नवा प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी वापरलेले इस्राईल आणि ऑस्ट्रियातील तंत्रज्ञान प्रभावी ठरले असले, तरी ते महागडे असल्याने पालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. त्यावर उपाय म्हणून स्वतःच नव्या तंत्रज्ञानाने मिश्रण तयार करण्याचा विचार महापालिका करत आहे.

खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने दम भरल्यानंतर दोन नव्या तंत्रांनी महापालिकेने खड्डे बुजवले होते. ऑस्ट्रियातील "इकोग्रीन' आणि इस्राईल येथील "स्मार्टएज' तंत्रज्ञान वापरण्यात आले. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले असले, तरी त्याचा दर खड्डे बुजवण्यासाठी सध्या येणाऱ्या खर्चाच्या अनेक पट आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत पालिका प्रशासन संभ्रमात आहे. हे दोन्ही तंत्रज्ञान वापरल्यास खड्डे दुरुस्तीचा खर्च अनेक पटीने वाढू शकेल. या महागड्या तंत्रज्ञानावर पालिका सध्या उपाय शोधत आहे. खासगी कंपन्यांकडून नव्या तंत्रज्ञानाचे मिश्रण विकत घेण्याऐवजी, असे मिश्रण स्वत:च तयार करण्याचा विचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेच्या कारखान्यात नवे मिश्रण तयार करण्याबाबत लवकरच चाचपणी केली जाण्याची शक्‍यता आहे.

'खड्ड्यांत' गेलेले पैसे...
- खड्डे बुजविण्यासाठी पाच वर्षांत 280 कोटी खर्च
- गेल्या वर्षी 150 टन डांबरचा वापर
- दरवर्षी सरासरी 50 ते 60 कोटी खर्च
- इकोग्रीनसाठी किलोला 120 रुपये खर्च
- स्मार्टएजसाठी किलोला 190 रुपये खर्च

Web Title: new experiment in mumbai potholes