
जळगावसाठी ७५० एकरांवर नवीन औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्र्यांची महाराष्ट्र चेंबरला हमी
मुंबई : जळगांव जिल्ह्यातील नवीन उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी कुसुंबा जवळ ७५० एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारली जाईल, अशी हमी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरसोबत झालेल्या बैठकीत दिली. यासाठी एमआयडीसी चे अधिकारी येत्या आठवड्यात जागेची पाहणी करून अहवाल सादर करतील.
तसेच एमआयडीसीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्यात येईल. कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा एक महिन्यात निश्चित केली जाईल, असे विविध निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. आमदार सुरेश भोळे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले.
आमदार सुरेश भोळे यांनी उद्योजकांचे प्रश्न तातडीने निकाली निघावेत, त्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. महाराष्ट्र चेंबरच्या जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजक संगीता पाटील, तसेच महेंद्र रायसोनी,
नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेऊन विविध प्रश्न मांडले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जळगांव शहरातील व्यापारी-उद्योजकांचे प्रश्न मांडून याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच चोपडा, भुसावळ, भडगांव येथील औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी केली.
एमआयडीसी क्षेत्रात अग्निशामन केंद्र उभारण्याची मागणीही करण्यात आली. विमानसेवा, पायाभुत सुविधा, एपीएमसी कायदा, प्रमोशनल टॅक्स यासंबंधीच्या मागण्या गांधी यांनी सादर केल्या.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन कामगार विमा योजना हॉस्पिटलसाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली. व्यापाऱ्यांचे विविध विभागांशी संबंधित स्थानिक प्रश्न लवकर निकाली निघण्यासाठी व्यापार मित्र समिती नेमण्याची मागणी गांधी यांनी केली, त्यास मान्यता देण्यात आली.
दुकानगाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न, दुहेरी कर आकारणी व अन्य धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला. जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजक संगिता पाटील यांनी जळगांव जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान या बैठकीसंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.