स्वाइन फ्लू तपासणीसाठी जिल्हा स्तरावर नवीन प्रयोगशाळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई - स्वाइन फ्लूला कारणीभूत असलेले विषाणू तपासण्यासाठी लवकरच नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी (ता. 28) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सध्या राज्यात 31 प्रयोगशाळा असून, त्यापैकी फक्त सहा सरकारी आहेत.

स्वाइन फ्लूचा विळखा मुंबईसह राज्यभरात वाढत आहे; मात्र निदान करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर प्रयोगशाळा सुरू करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली.

मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांत स्वाइन फ्लू तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांत नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नगर आदी जिल्ह्यांतही प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. स्वाइन फ्लूचे निदान वेळेत होणे गरजेचे असते. त्यामुळे विषाणूंची तपासणी तातडीने आणि सवलतीच्या दरात व्हायला हवी, अशी मागणी याचिकादारांच्या वतीने ऍड. प्राजक्ता सामंत यांनी केली. या प्रयोगशाळांमध्ये कमी शुल्क आकारावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होईल.

Web Title: New laboratory for Swine Flu Checking State Government