वृद्धेकडून मरणोत्तर अवयवदान 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 7 जून 2019

अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले.

मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली. 

परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना दाखल करण्यात आले. अपत्य नसलेल्या संध्या टिळक पतीचे निधन झाल्यावर दादर येथील घरात एकट्याच राहत होत्या. बराच वेळ झोपून राहिल्यामुळे त्यांना उठवण्याचा प्रयत्न घरकाम करणाऱ्या महिलेने केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. सीटी स्कॅन केले असता, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपचारादरम्यान बुधवारी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. 

ग्लोबल रुग्णालयाचे अवयवदान समन्वयक राहुल वासनिक यांनी त्यांच्या भाच्याला मरणोत्तर अवयवदानाबाबत माहिती दिली. त्याने अवयवदानासाठी होकार दिल्यावर संध्या टिळक यांची दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृताचे दान करण्यात आले. वृद्धापकाळामुळे त्यांचे हृदय वापरता आले नाही, अशी माहिती वासनिक यांनी दिली. अवयवदानाच्या माध्यमातून आत्याची आठवण कायम राहावी, यासाठी संमती दिल्याचे त्यांच्या भाच्याने सांगितले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Life Three Patients