दहिसर नदीला नाल्याची अवकळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

मुंबई - बारा वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या महाप्रलयात दहिसरला तडाखा देणाऱ्या दहिसर नदीची परिस्थिती `जैसे थे` आहे. तिच्या पात्राचे रुंदीकरण करण्यात आले; परंतु तिच्या पात्रात तबेल्यातील शेण-कचरा आणि जनावरांचे मृतदेह फेकणाऱ्या बेफिकीर माणसांची वृत्ती मात्र अरुंदच आहे.  

मुंबई - बारा वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या महाप्रलयात दहिसरला तडाखा देणाऱ्या दहिसर नदीची परिस्थिती `जैसे थे` आहे. तिच्या पात्राचे रुंदीकरण करण्यात आले; परंतु तिच्या पात्रात तबेल्यातील शेण-कचरा आणि जनावरांचे मृतदेह फेकणाऱ्या बेफिकीर माणसांची वृत्ती मात्र अरुंदच आहे.  

या नदीलाही तिच्या काठावरच्या माणसांनी नाल्याची अवकळा आणली आहे. बांधकामांचा राडारोडा, कचऱ्याचा खच पात्रात आहे. कंत्राटदाराचा जेसीबी फक्त ‘शोभे’साठी नदीच्या पात्रात सध्या उभा आहे. महापालिका ९५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे; मात्र दहिसर नदीने पालिकेचा हा दावा खोटा ठरवला. नदीच्या उगमाजवळच गाळ आणि शेणाचे डोंगर उभे राहिले आहेत. परिणामी यंदाही तिच्या प्रवाहात अडथळा येण्याची शक्‍यता आहे. 

नदीतल गाळ काढलेला नाही. पावसाळी लहान नालेही साफ केलेले नाहीत. त्यात सर्रास तबेल्यांतील शेण टाकले जाते. पालिकेचे अधिकारी कारवाई करीत नाहीत. यंदाही पाणी तुंबण्याची शक्‍यता आहे. 
- प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक 

नदीपात्राची सफाई अजूनही झालेली नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही नदीची साफसफाई सुरू आहे. यंदा पात्रातील गाळ आणि शेण काढलेले नाही.
- राजू अशन, दौलत नगर 

नाल्यात शेण टाकले जाते. प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. विविध समित्यांमध्ये हा प्रश्‍न उपस्थित केला. पत्रव्यवहार केला; मात्र प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. नालेसफाईचे काम सुरू आहे. 
- रिद्धी खुरसुंगे, नगरसेविका 

अजूनही नालेसफाई झालेली नाही. गाळ तसाच आहे. या वर्षी मोठ्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात पाणी भरण्याची भीती आहे.
- सुरेश मदाळे, दौलन नगर

वैशिष्ट्ये
दहिसर नदीची लांबी १२ किलोमीटर 
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात उगम होऊन दहिसरमध्ये मनोरी खाडीतून अरबी समुद्राला मिळते. 
पाणलोट क्षेत्र - सुमारे ३४८८ हेक्‍टर 
सफाईला गुण - १० पैकी ३
पश्‍चिम द्रुतगती मार्गाजवळील तबेल्यांतील शेण नदीपात्रात सोडले जाते
राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडल्यापासून दौलत नगर, लेप्रसी कॉलनीपर्यंत नालेसफाई झालेली नाही
शेण टाकणाऱ्या तबेलामालकांकडून गेल्या वर्षी २६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. 
दंडवसुलीनंतरही तबेलेमालक बेशिस्तच 

Web Title: new mumbai dahisar river