नवी मुंबईत मुसळधार पाऊस! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

शहरात पडलेला पाऊस 
बेलापूर 64.3 
नेरूळ 46.6 
वाशी 20.2 
ऐरोली 19.3 

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शहराचा पारा उतरला होता. आकाश काळवंडून थंड हवा सुटली होती. त्यामुळे पावसाची शक्‍यता वाढली असतानाच दुपारनंतर वरुण राजाने नवी मुंबईत काही ठिकाणी बरसण्यास सुरुवात केली. नवी मुंबईसह पनवेल व उरण भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई, नवी मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याने वर्तवला होता. तशा सूचनाही मच्छीमार आणि सरकारी व आपत्ती व्यवस्थापनांना दिल्या होत्या. मंगळवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत धुकेही पडल्याने अगदी 100 मीटर अंतरावरचा परिसरही धुक्‍यामुळे गडप झाला होता. दुपारी 1.30 पासून सुरू झालेल्या पावसाची 37 मिमी एवढी नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. जोरदार वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटानंतर पावसाला सुरुवात झाली. आधी संथगतीने पडणाऱ्या पावसाने सायंकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. 

Web Title: new mumbai Heavy rain