नवी मुंबईच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

काय आहे मरिना प्रकल्प 
देशात कोची येथे मरिना प्रकल्प उभारण्यात आला आहे. समुद्रकिनारी वॉटर फ्रंड तयार केला जातो. या फ्रंडच्या आधारावर स्पोर्टस बोट व इतर खासगी बोटी उभ्या करण्यासाठी जागा तयार केली जाते. उभ्या केलेल्या बोटींजवळ जाण्यासाठी वॉटर फ्रंड वॉकवे तयार केला जातो. 

नवी मुंबई -  सीबीडी सेक्‍टर 15 येथे मेरीटाईम बोर्डाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मरिना प्रकल्पाला नाममात्र दरात जमीन भाडेतत्त्वावर देण्याची तयारी सिडकोने दर्शवली आहे. सिडकोच्या या सकारात्माक प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या किनारी देशातील दुसरा मरिना प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपासून आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको, मेरिटाईम बोर्ड व राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या लौकिकात भर पडणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सिडको व मेरिटाईम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला आहे. 

बेलापूर येथील पामबीच रोडशेजारी सेक्‍टर 15 येथील रेती बंदरावर खाडीकिनारी मरिना प्रकल्प तयार करण्याची घोषणा सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केली होती. रेती बंदर येथील जागा जरी सिडकोची असली, तरी हा प्रकल्प खाडीकिनारी होणार असल्याने तो महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातूनच तयार केला जाणार आहे. त्यामुळे रेती बंदरवरील जागा सिडकोकडून मेरिटाईम बोर्डाकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. रेती बंदर येथील सुमारे सात एकर जागेवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. ही जागा हस्तांतरणासाठी सिडकोकडून मेरिटाईम बोर्डाकडे आठ कोटींची मागणी करण्यात आली होती; परंतु एवढी मोठी रक्कम देणे शक्‍य नसल्याने नाममात्र दरात भूखंड द्यावा, अशी मागणी मेरिटाईम बोर्डाने सिडकोकडे केली होती. मेरिटाईम बोर्डाच्या या मागणीचा सिडकोने सकारात्मक विचार करावा, यासाठी मंदा म्हात्रे यांनी सिडको व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मध्यस्थीनंतर सिडकोने मेरिटाईम बोर्डाला मरिना प्रकल्पासाठी नाममात्र दरात भूखंड हस्तांतर करण्याची तयारी सिडकोने दर्शवली आहे. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मेरिटाईम बोर्डाला नाममात्र दरात भूखंड देण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले. सिडकोच्या या भूमिकेमुळे नवी मुंबईकरांना "ज्वेल ऑफ नवी मुंबई', "अर्बन हाट'नंतर मरिना प्रकल्पासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प मिळणार आहे. यामुळे नवी मुंबईच्या वैभवात आणखी एका स्थळाची भर पडणार असून पर्यटनाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. 

कागदावर असणारा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चार वर्षांपासून सिडको व मेरिटाईम बोर्डासोबत माझी सातत्याने चर्चा सुरू आहे. सिडकोच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी मुंबईतील समस्त प्रकल्पग्रस्तांना नवीन रोजगाराची संधी मरिना प्रकल्पातून निर्माण होणार आहे. 
- मंदा म्हात्रे, आमदार 

नवी मुंबईच्या प्रकल्पात काय आहे 
दिवाळे गावाच्या शेजारी तयार होणारा मरिना प्रकल्प चार टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1.8 किलोमीटर फ्रंडचा वॉटर वॉक वे तयार केला जाणार आहे. एका भागात पर्यटकांसाठी मरिना उद्यान, वॉटर रिक्रिएशन, फुड कोर्ट, स्केटिंग रिंग, खेळण्यासाठी मैदानासहीत मेडिटेशन सेंटर असणार आहे. दुसऱ्या भागात कांदळवन क्षेत्र, नंतरच्या टप्प्यात दिवाळे गाव व चौथ्या टप्प्यात भव्य प्रदर्शन केंद्र असेल. 

Web Title: new mumbai Marina Project