उद्यानाच्या नावाचे राजकारण? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

बेलापूर - जुईनगर प्रभाग- ८२ मधील सेक्‍टर- २४ येथील भूखंड क्रमांक एकवरील उद्यानाला आंबेडकरी संघटनांनी ‘माता रमाबाई आंबेडकर’ असे नाव दिले होते. त्याला विरोध करत नगरसेवकाने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ असे नाव देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय प्रभाग समितीच्या बैठकीत घेतला असल्याने या उद्यानाच्या नावावरून जुईनगरमधील राजकाराण तापण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जुईनगरमधील भूखंड क्रमांक एक उद्यानासाठी राखीव आहे. या भूखंडावर उद्यान विकसित करण्याचे काम सुरू असून जुईनगरमधील आंबेडकरी संघटनांनी या उद्यानाला माता रमाबाई आंबेडकरांचे नाव दिले होते. त्याला भारिप बहुजन संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, प्रबुद्ध सेवा संघ यांनी पाठिंबा दिला होता. या नामकरणानंतर पालिका या नामफलकावर कारवाई करणार असल्याची अफवा पसरली होती. त्या वेळी कारवाईला विरोध करण्यासाठी शेकडो आंबेडकरी अनुयायी एकवटले होते. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी उद्यानाला दिलेले नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव नगरसेवक विशाल ससाणे यांनी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रभाग समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला आहे. उद्यानाचे काम पूर्ण झाले नसताना आंबेडकरी अनुयायांनी उद्यानाला रमाबाई आंबेडकर यांच्या दिलेल्या नावाला नगरसेवक विरोध करीत असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांनी केला आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या नावाला आमचा विरोध नाही; परंतु माता रमाबाई आंबेडकर हे नाव प्रभागातील आंबेडकरी अनुयायांनी दिले आहे. याच प्रभागातील बहुउद्देशीय इमारतीला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे. आरक्षित भूखंडावर उद्यान होत असताना महासभेत लोकप्रतिनिधींनी मैदानाची मागणी केली होती.
- रवींद्र सावंत, अध्यक्ष, नवी मुंबई इंटक सेल 

जुईनगरमधील सावित्रीबाई फुले महिला मंडळाने या उद्यानाला ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणीही कोणत्याही नावाची मागणी केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सावित्रीबाई फुले नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 
- विशाल ससाणे, नगरसेवक

Web Title: new mumbai news belapur Garden politics