छगन भुजबळांना सिडकोचा दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी मुंबई - मुदतीत भूखंडावरील बांधकाम पूर्ण न केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सिडकोने वाटप केलेला भूखंड रद्द करून दणका दिला आहे.

नवी मुंबई - मुदतीत भूखंडावरील बांधकाम पूर्ण न केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सिडकोने वाटप केलेला भूखंड रद्द करून दणका दिला आहे.

बेहिशेबी मालमत्तेवरून सध्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांच्या संस्थेला सिडकोने 2003 मध्ये सानपाडा सेक्‍टर 15 येथील 3 हजार 491 चौरस मीटरचा भूखंड सवलतीच्या दरात दिला होता. सिडकोकडून भुजबळ यांच्या संस्थेने केवळ 65 लाख 46 हजार 623 रुपयांना भूखंड खरेदी केला होता. या भूखंडावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीसाठी आरक्षण होते; मात्र या भूखंडांवर शैक्षणिक संस्थेने कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. तसेच संस्थेने आतापर्यंत सिडकोकडून भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी परवानगीही घेतलेली नाही. या संस्थेला बांधकाम परवानगीसाठी सिडकोकडून मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु तरीही संस्थेने बांधकामाला सुरवात केली नाही. त्याविरोधात सिडकोने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. सिडकोने बजावलेल्या नोटिशीला संस्थेने दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याने अखेर सिडकोने संस्थेला वाटप केलेला भूखंड रद्दबातल ठरवला आहे.

भूखंड पुनर्विक्रीची प्रक्रिया सुरू
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे शैक्षणिक संस्थेसाठी सवलतीच्या दरात भूखंड वाटप केला होता; परंतु संस्थेने मुदतीत भूखंडावर बांधकामाला सुरवात न केल्यामुळे भूखंड वाटप रद्द करण्यात आले. आता भूखंडाच्या पुनर्विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी सांगितले.

Web Title: new mumbai news chhagan bhujbal sidco