फिफासाठी पालिकेची तयारी

फिफासाठी पालिकेची तयारी

नवी मुंबई - फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०१७ चे यजमानपद नवी मुंबईच्या वाट्याला आल्यामुळे महापालिकेने फिफा वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी जोरदार नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ‘फिफा’मुळे जागतिक पातळीवरील खेळाडू आणि प्रेक्षक नवी मुंबईत येणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शहराचे प्रवेशद्वार, वाहतूक बेटे व उड्डाणपुलांखालील परिसर यांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना आयुक्त एन. रामास्वामी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. शनिवारी रामास्वामी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित विभागांना सुशोभीकरणाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. 

ऑक्‍टोबरच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सामने खेळले जाणार आहेत. शहरात येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य चांगले व्हावे, त्यांना शहरात प्रसन्न वाटावे, यासाठी आयुक्तांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई शहराला एखाद्या नववधूप्रमाणे सजवले जाणार आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांवर विशेष सजावट केली जाणार आहे. शीव-पनवेल महामार्गावरील वाशी टोलनाका, ऐरोली-मुलुंड टोलनाका, ठाणे-बेलापूर मार्गावर कळवा-विटावा, कल्याण-शिळफाटा मार्गावर व खारघरजवळ सजावट करण्यात येणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांचे संदेशाने स्वागत करण्यासाठी भव्य बॅनर लावले जाणार आहेत. 

शहरातील पाम बीच मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर या मार्गावर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरात प्रवेश केल्यावर वळणांवर लागणारी प्रवासी बेटे कात टाकणार आहेत. सीबीडी सर्कल, सानपाडा येथील मोराज सर्कल, वाशीतील शिवाजी महाराज चौक, नेरूळ येथील एलपी उड्डाणपुलाखालील चौक यांचे सुशोभीकरण करून फुटबॉलसंबंधी संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. उड्डाणपुलांखालील डेब्रिज काढून त्या जागी फुटबॉलचे संदेश देणारे देखावे साकारले जाणार आहेत. उड्डाणपुलांच्या खांबांवर रोषणाईचा साज चढवला जाणार आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना सराव करण्यासाठी नवी मुंबईतील नेरूळ सेक्‍टर १९ मधील महापालिकेचे यशवंतराव चव्हाण मैदान व वाशीतील एनएमएसएचे मैदान निवडण्यात आले आहे. 

महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण मैदानावर जागतिक पातळीवरचे फुटबॉल मैदान बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र फुटबॉल सामन्यांच्या निमित्ताने जगभरातील मान्यवर नवी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे या सामन्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  

जागतिक दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी तब्बल एक कोटी ९० लाख खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मैदानावर लावण्यात येणारे गवतही परदेशातून मागवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com