पावसाचा रविवार! 

पावसाचा रविवार! 

नवी मुंबई - शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळीही कायम होता. त्यामुळे शहरातील मसाला मार्केटसह तुर्भे पोलिस ठाण्याच्या आवारात गुडघाभर पाणी साचले होते. शहरात सहा ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. सकाळपासूनच पावसाची संततधार असल्याने बच्चे कंपनी आणि तरुणांनी पावसात भिजण्याचा आणि खेळण्याचा आनंद घेऊन रविवारच्या सुटीची मौजमजा लुटली. पावसामुळे शहराशेजारच्या डोंगरांवरून धबधबे वहात होते. 

काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा शनिवारपासून बरसण्यास सुरुवात केली. नवी मुंबईत सुरू असलेल्या पावसाची 24 तासांमध्ये 98.4 मिमी इतकी नोंद झाली. नवी मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद ऐरोलीत झाली. तेथे 121.4 मिमी पाऊस पडला. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील नालेसफाईची पोलखोल केली. मसाला मार्केटमधील अंतर्गत गटारांची साफसफाई झाली नसल्यामुळे "इ' विंगमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. सकाळी हे पाणी उपसण्यास कोणीच न आल्याने दुपारपर्यंत वाहने उभी करण्याच्या या जागेला तळ्याचे रूप आले होते. रविवारी सुटीमुळे मार्केट बंद असल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांना याचा त्रास झाला नाही. 

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे पोलिस ठाण्यात यंदा पाणी साचले नसले तरी त्याच्या आवारात सकाळी गुडघाभर पाणी होते. दिघ्यातील ईश्‍वरनगर झोपडपट्टीत गुडघाभर पाणी साचल्याने काही झोपड्यांमध्ये ते घुसले होते. सानपाडा रेल्वेस्थानकाच्या आवारातही काही वेळ पाणी साचले होते. या ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाणी उपसले. सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे नवी मुंबईतील काही मैदानांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे त्यांना तळ्याचे रूप आले होते. त्यात बच्चे कंपनीने मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. पावसामुळे शहराजवळील धबधबे पुन्हा वाहण्यास सुरुवात झाल्याने तरुणांनी त्याचाही आनंद लुटला. एमआयडीसीतील गवळी देव व सीबीडी-बेलापूर येथील सेक्‍टर 8 मधील धबधबा वाहू लागल्याने तरुणांनी तेथे गर्दी केली होती. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. 

ऐरोलीत वीज गायब 
रात्रभर पडणाऱ्या पावसासोबत सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट असल्यामुळे ऐरोलीच्या काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रात्रभर ऐरोलीत विजेचा लपंडाव सुरू होता. त्याचा परिणाम तेथील पाणीपुरवठ्यावर झाला. सकाळी कमी दाबाने सोडले जात असल्यामुळे पाणी उंच इमारतींच्या टाक्‍या रिकाम्याच राहिल्या. त्यामुळे तेथील रहिवाशांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. 

शहरात 98.4 मिमी पाऊस 
24 तासांत बेलापूरमध्ये 86.2, नेरूळ 84.8, वाशी 98.4 व ऐरोलीमध्ये 121.4 मिमी पावसाची नोंद झाली. शहरात एकूण पाच ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com