शिरवणे शाळा क्रीडांगण की वाहनतळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या शिरवणे येथील स्व. अरुण सुतार विद्यालयाच्या मैदानावर खासगी वाहने उभी करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे बेकायदा पार्किंग हटवण्याची मागणी शिक्षक आणि नागरिक करीत आहेत.  

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेच्या शिरवणे येथील स्व. अरुण सुतार विद्यालयाच्या मैदानावर खासगी वाहने उभी करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे बेकायदा पार्किंग हटवण्याची मागणी शिक्षक आणि नागरिक करीत आहेत.  

नवी मुंबई महापालिकेचे शिरवणे येथे स्व. अरुण सुतार (माजी सरपंच) विद्यालय आहे. या विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची शाळा आहे. शाळेसमोरच्या मोठ्या मैदानावर विद्यार्थ्यांच्या कवायती, मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. परंतु अनेक वर्षांपासून या मैदानावर खासगी वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मैदानावर खेळता येत नाही. शिवाय मैदानावर उभ्या असलेल्या वाहनांमधून वाट काढत विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. शिरवणे गावात ये-जा करण्यासाठी अन्य मोठा रस्ता नसल्याने नागरिकांना या शाळेच्या मैदानातूनच ये-जा करावी लागते. त्यांचीही या बेकायदा पार्किंगमुळे गैरसोय होते. गावातील रस्ते अरुंद असल्याने शाळेच्या मैदानावरच वाहने उभी केली जातात. रात्री वाहनांचे प्रमाण दुप्पट होते. शाळा सुरू असताना ती मैदानाबाहेर नेण्यात येतात. त्यांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यांचे लक्ष विचलित होते. काही वाहनचालक वाहने उभी करून बाहेरगावी जातात. अनेक दिवस ती तेथे उभी असतात. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत.

रस्ते लहान असल्याने वाहने आणि पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहने शाळेच्या मैदानात उभी केली जातात. या मैदानातून गावात जाणारा एक रस्ता बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहने उभी करण्यास बंदी घालावी, अशी मागणीही पालिकेकडे करणार आहे.  
- ज्ञानेश्वर सुतार, स्थानिक नगरसेवक.

शाळेच्या मैदानावरील अवैध पार्किंगविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. विभाग कार्यालय आणि आरटीओला पत्र दिले आहे. पूर्वी तेथील वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येईल.
- संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई पालिका.

Web Title: new mumbai news School Playground parking belapur