ठाणे-बेलापूर रस्त्यावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत होती; परंतु आता पाऊस सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची ही समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत होती; परंतु आता पाऊस सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची ही समस्या आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने या मार्गावर तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने हे काम केले जात आहे. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १५३ कोटींची ही कामे हाती घेतली आहेत. नवी मुंबईतून मुंबई, पुणे, गोवा, जेएनपीटीकडे जाणारे अनेक मोठे रस्ते आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेंर्तगत ठाणे-बेलापूर मार्गाचे आठ वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यासाठी २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून ३० कोटी खर्च करून रबाळे ते महापे हा एमआयडीसीला समांतर सर्व्हिस रोड बांधला आहे. तरीही गर्दीच्या वेळी ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पालिकेने या मार्गावर सविता केमिकल्स, तळवली आणि घणसोली नाका येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. या तीन उड्डाणपुलांबरोबरच महापे येथे तीन बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीची सोय व्हावी म्हणून या चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीवर ताण वाढत आहे. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. 

दुचाकीस्वारांमुळे परिस्थिती बिकट
ठाणे-बेलापूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची परिस्थिती दुचाकीस्वारांमुळे अधिकच बिकट झाली आहे. येथे वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वार पदपथांचा वापर तर करतातच; शिवाय वाहनांच्या मधूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणखी बिकट होत आहे. कामे सुरू असल्याने आधीच वाहतुकीचा वेग मंदावला असताना महापे जंक्‍शनजवळचा रस्ता खराब झाल्याने पुन्हा तेथे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: new mumbai news thane-belapur road traffic