बहुउद्देशीय इमारत पाडण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी मुंबई - वाशी सेक्‍टर १४ येथे बांधकाम सुरू असलेली बहुउद्देशीय इमारत खचल्याने ती पाडण्याचे आदेश पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी दिले आहेत. मंगळवारी (ता. २५) आयुक्तांनी वाशी विभागातील विकासकामांची पाहणी केली. यात त्यांनी खचलेल्या इमारतीच्या बांधकामाचीही पाहणी केली. त्यानंतर ती पाडण्याचे आदेश देऊन संबंधित अभियंत्यांच्या चौकशीचे संकेत दिले. या बांधकामाची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्‍चित करण्यात येणार आहे. 

शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या पाहणी दौऱ्यात या निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाली. त्या वेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत बांधकामात झालेल्या दिरंगाईचा जाब विचारला. तीन मजल्यांच्या या इमारतीचे खांब खचल्याचे आढळले. त्याला कंत्राटदाराने लोखंडी खांबांचा आधार दिल्याचे पाहून रामास्वामी अधिक संतापले. बांधकाम सुरू असतानाच जर तीन मजल्यांचा भार इमारत पेलत नसेल, तर तिचा वापर सुरू झाल्यावर ती कशी टिकेल, असा प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यामुळे ही इमारत पाडून पुन्हा नव्याने बांधण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. वाशीतील सेक्‍टर १४ येथे भूखंड क्रमांक ४ व ५ येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिका अंदाजे पाच कोटी ५९ लाख ८८ हजार ४४२ इतका खर्च करणार आहे; मात्र महापालिकेच्या परंपरेनुसार या रकमेवर २४.९५ टक्के वाढ करून सहा कोटी ९९ लाख ५७ हजार ५५८ रुपये इतक्‍या निधीला प्रशासकीय मंजुरी देऊन हे काम मे. मोक्षा कन्स्ट्रक्‍शनला दिले होते. त्यांना बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत दिली होती; परंतु कंत्राटदार वारंवार मुदतवाढ घेत असल्याने आजतागायत तिचे काम झालेले नाही. ही इमारत बांधकाम सुरू असतानाच खचली असल्याने ती पाडून नव्याने बांधण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रकरण अधिकाऱ्यांवर शेकणार? 
सात कोटींच्या या इमारतीचे झालेले बांधकाम पाडून नवी इमारत बांधण्यात येणार आहे. हे काम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणार आहे; परंतु यात महापालिकेचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाणार असल्याने असे प्रकार पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.  

वाशीतील बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहताच क्षणी लक्षात आले. त्यामुळे ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. या बांधकामासाठी पालिका कंत्राटदाराला पैसे देणार आहे. त्यामुळे बांधकामाच्या दर्जात कुठेही तडजोड करणार नाही. 
- एन. रामास्वामी, आयुक्त

Web Title: new mumbai news Vashi construction

टॅग्स