पाम बीच मार्ग कात टाकणार! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नवी मुंबई - शहरातील "नेकलेस क्वीन' अशी ओळख असलेला पाम बीच रस्ता जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोसर्फेसिंगने दुरुस्त करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेविरहित होणार असल्याने येथील प्रवास अधिक सुकर होणार आहे. बुधवारी (ता. 28) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सादरीकरणानंतर सर्व सदस्यांनी मायक्रोसर्फेसिंगच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यात किल्ले गावठाण ते वाशी सेक्‍टर- 17 पर्यंतच्या रस्त्यावर डांबराचा थर टाकून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. 

सीबीडी-बेलापूर येथील किल्ले गावठाणापासून पाम बीच रस्ता सुरू होतो. तो वाशी सेक्‍टर- 17 पर्यंत आहे. सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सिडकोने 105 कोटी खर्च करून हा रस्ता तयार केला आहे. 2001 मध्ये हा रस्ता सिडकोने महापालिकेकडे वर्ग केला. तेव्हापासून या रस्त्यासाठी पालिकेने एक रुपयाचाही खर्च केला नव्हता. प्रशस्त, दोन्ही बाजूंना झाडे व हिरवळ, जलद प्रवास यामुळे पाम बीच रोड वाहनचालक आणि प्रवाशांच्या पसंतीचा मार्ग बनला. परंतु गेल्या काही वर्षांपासून या मार्गाकडे महापालिकेने लक्ष न दिल्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी तडे गेले आहेत. सिग्नलजवळ खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोसर्फेसिंग आधारावर डांबराचा थर टाकून दुरुस्त करावा, असा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने पटलावर आणला होता. मात्र या कंत्राटात लोकप्रतिनिधींनी खोडा घातल्यामुळे तो रखडला होता. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. परंतु मायक्रोसर्फेसिंग लेयर टाकून रस्ता तयार केल्यास रस्त्याचा दर्जा सुधारून त्यावर खड्डे पडणार नाहीत. तशी कंत्राटदाराकडून पाच वर्षांची खात्री देण्यात येईल. पाम बीच मार्गाच्या नूतनीकरणासाठी 40 कोटींचा खर्च येण्याची शक्‍यता असताना मायक्रोसर्फेसिंगद्वारे काम केल्यास ते आठ कोटींमध्ये होईल. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात बचत होईल, असे अभियांत्रिकी विभागाकडून सहशहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. तेव्हा पाम बीच मार्ग मायक्रोसर्फेसिंग लेयर टाकून दुरुस्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

मायक्रोसर्फेसिंगचे फायदे 
रस्त्याचे काम करताना प्रचलित पद्धतीने काम केल्यास आधीचा रस्त्यावरील डांबराचा थर काढून टाकावा लागतो. त्यामुळे डेब्रिज तयार होऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा नवा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा राहतो. मात्र मायक्रोसर्फेसिंगद्वारे काम करताना रस्ता खोदावा लागत नाही. काम केल्यावर दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते. पर्यायाने वाहतूक कोंडी, ध्वनी व वायुप्रदूषण होत नाही. त्यामुळे 40 टक्के खर्चात बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. 

Web Title: new mumbai Palm Beach