"नवी मुंबई पोलिस प्यालेले' आणि "व्यक्ती गहाळ'! 

विक्रम गायकवाड
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नवी मुंबई : "नवी मुंबई पोलिस प्यालेले', "व्यक्ती गहाळ' ही वाक्‍ये वाचून दचकलात ना? पण, हे दुसरे-तिसरे कोणीच म्हणत नाहिये... नवी मुंबई पोलिसांनी स्वतःच त्यांच्या संकेतस्थळावर ही वाक्‍ये इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना लिहिली आहेत. 

नवी मुंबई : "नवी मुंबई पोलिस प्यालेले', "व्यक्ती गहाळ' ही वाक्‍ये वाचून दचकलात ना? पण, हे दुसरे-तिसरे कोणीच म्हणत नाहिये... नवी मुंबई पोलिसांनी स्वतःच त्यांच्या संकेतस्थळावर ही वाक्‍ये इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना लिहिली आहेत. 

महाराष्ट्राची राजभाषा मराठी किती अशुद्ध लिहिली जाऊ शकते, याची प्रचिती घ्यायची असेल तर नवी मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. या संकेतस्थळावर जाताच सुरुवातीला इंग्रजी भाषेतील मजकूर दिसेल. त्यातच "भाषा निवडा' असा पर्याय आहे. तिथे क्‍लिक केल्यावर मराठी आणि हिंदी हे पर्याय येतात. त्यातला कुठलाही पर्याय निवडल्यास राष्ट्रभाषा आणि मातृभाषेची केलेली ऐशीतैशी पाहून कुणालाही संतापच येईल, इतकी अशुद्ध भाषा या संकेतस्थळावर आहे. एका ठिकाणी तर "नवी मुंबई पोलिस प्यालेले आणि ड्राईव्ह अहवाल' असे भाषांतर झाले आहे. त्यामुळे खरेच नवी मुंबई पोलिस "प्यालेले' आहेत काय, असा संतप्त सवाल काही "नेट'कऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

वेगवेगळ्या विषयांचे शीर्षक देण्यापासूनच या भाषांतराची सुरुवात होते. इंग्रजीत "होम'चे भाषांतर चक्क "घर' असे केले आहे. जसजसे पुढे जाल तसतसे अतर्क्‍य भाषांतराने "हसू की रडू' अशी अवस्था होईल. "हेल्प अस टू हेल्प यू' हे इंग्रजीतील उपशीर्षक "आमच्या आपल्याला मदत करण्यास मदत करा' असे असंबंध वाक्‍य दिसेल. त्यातील मजकुरावर नजर टाकल्यास आपल्याला मराठी वाचता येत नाही, असा भास होईल. एका शब्दाचे दुसऱ्या शब्दाशी नाते असते का, असाही प्रश्‍न पडेल. वाक्‍यरचनेवरून आपल्याला जे काही व्याकरण माहीत असेल, त्याच्याशी या संकेतस्थळाचा दुरान्वयानेही संबंध नाही, याचीच प्रचिती येईल. 

https://www.navimumbaipolice.gov.in या वेबसाईटच्या मुखपृष्ठावरच पोलिसांच्या विविध ऍप्सची माहिती देण्यात आली आहे. "पोलिस ऍप्स'चे भाषांतर "पोलिस अनुप्रयोग' असा आहे. त्यातील वेगवेगळे ऍप्स पाहिल्यास "सिटीझन कॉप' या ऍपचा अनुवाद "नागरिक पकडणे' असा केला आहे. यातही कहर म्हणजे "ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह रिपोर्ट ऑफ नवी मुंबई पोलिस' याचे भाषांतर "नवी मुंबई पोलिस प्यालेले आणि ड्राईव्ह अहवाल' असा असल्याने खरेच हे संकेतस्थळ तयार करताना नवी मुंबई पोलिस "प्यालेले' होते का, असा संतप्त सवाल काही मराठीप्रेमी "नेट'कऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
या संकेतस्थळाच्या अंतरंगात गेल्यास अनेक गमतीजमती बघायला मिळतात. "मिसिंग पर्सन्स'चे "गहाळ व्यक्तींना', "अनक्‍लेम डेड बॉडी'चे "दावा न मृतदेह' असे एक-दोन नव्हे तर प्रत्येक ठिकाणी मराठी आणि हिंदीचे चुकीचेच भाषांतर करण्यात आले आहे. 

नवी मुंबई पोलिस दलात बहुतांश पोलिस अधिकारी, कर्मचारी हे मराठी भाषिक व महाराष्ट्रातील आहेत. असे असतानाही नवी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरून मराठी भाषेची सुरू असलेली अवहेलना कुणाच्याच निदर्शनास न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नवी मुंबईतील नागरिकांना माहिती देण्यासाठी पोलिसांनी त्यांचे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. मराठी व हिंदीभाषिक नागरिकांच्या सोयीसाठी इंग्रजीबरोबरच मराठी आणि हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इंग्रजीतून मराठी आणि हिंदीत अनुवाद केलेले शब्द, वाक्‍य, अर्थहीन असून अशुद्ध शब्दरचनांमुळे या संकेतस्थळाचे हसे झाले आहे. 

Web Title: New mumbai police website shows wrong information