महापालिकेला मिळणार सशस्त्र सुरक्षा रक्षक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

नवी मुंबई  - महापालिका मुख्यालय, महापौर निवासस्थान आणि आयुक्त निवासस्थानासहीत इतर कार्यालयांना आता लवकरच सशस्त्र सुरक्षा रक्षक मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांकडून सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने तसा प्रस्ताव तयार केला असून त्यांच्या वेतनापोटी 2 कोटी 73 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

नवी मुंबई  - महापालिका मुख्यालय, महापौर निवासस्थान आणि आयुक्त निवासस्थानासहीत इतर कार्यालयांना आता लवकरच सशस्त्र सुरक्षा रक्षक मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांकडून सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने तसा प्रस्ताव तयार केला असून त्यांच्या वेतनापोटी 2 कोटी 73 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एकूण 74 रक्षक तैनात केले जाणार आहेत. त्यानुसार महापालिका मुख्यालय, महापौर निवासस्थान व आयुक्त निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत. नव्या रक्षकांच्या गणवेशासह शस्त्रांचा खर्च महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून करण्यात येणार आहे. महापालिकेकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक तैनात केल्यास 12 महिन्यांच्या वेतनावर 2 कोटी 24 लाख 52 हजार 600 रुपये इतका खर्च येणे अपेक्षित आहे; तर महामंडळाला एक महिन्याचे आगाऊ वेतन आणि 3 महिन्यांची सुरक्षा अनामत रक्कम अशी एकूण 67 लाख 52 हजार 50 रुपये इतकी रक्कम अदा करावी लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयांसहीत इतर महत्त्वाच्या कार्यालय आणि इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर आहे; मात्र यात बंदूकधारी सुरक्षा रक्षक नसल्याने महापालिका मुख्यालयासहीत इतर महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे आहे. तसेच अलीकडच्या काळात महापालिका मुख्यालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे महापौर सुधाकर सोनवणे यांना मिळाली होती. या घटनेनंतरही महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेत फारसे बदल करण्यात आले नव्हते; परंतु दिवसेंदिवस महापालिकेचा वाढता व्याप व महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला मिळालेला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा दर्जा लक्षात घेत मुख्यलयाच्या इमारतीसह इतर इमारतींच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

सुरक्षा रक्षक मंडळाच्या रक्षकांना दिलासा 
महापालिकेच्या मुख्यालय, महापौर व आयुक्त निवासस्थानांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळांच्या रक्षकांवर आहे; मात्र त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक तैनात होणार असल्याने सुरक्षा रक्षक मंडळाच्या रक्षकांना महापालिकेच्या इतर कार्यालयात गरजेप्रमाणे नियुक्त करण्यात येणार आहे. 

Web Title: new mumbai Security guard bmc