झोपडीदादांचे उखळ पांढरे

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई शहराला बेकायदा झोपड्यांचा पडलेला विळखा घट्ट होत असल्यामुळे शहर बकाल होतेय...

नवी मुंबई - शहरातील घरांचे दर गगनाला भिडले असताना बेकायदा झोपड्यांचीही विक्री लाखो रुपयांना होत असल्याचे महापालिकेला निदर्शनास आले आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर बांधलेल्या झोपड्यांची झोपडीदादा खुलेआम विक्री करून लाखोंचा मलिदा खिशात टाकत आहेत.

मोकळ्या जागेवर पत्रे व ताडपत्र्यांच्या झोपड्या बांधण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. याबाबत नागरिकांनीच महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.

महापालिकेने २००२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे एमआयडीसी, जिल्हाधिकारी व सिडकोच्या जागेवर ४८ झोपडपट्ट्या आहेत. तेथे ४२ हजार बेकायदा झोपड्या आहेत. त्यानंतर तब्बल १५ वर्षे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी झोपडीदादा सक्रिय झाले आहेत. तुर्भे नाका व तुर्भे स्टोअर येथील झोपडीची किंमत पाच लाखांपासून सुरू होते. २३ लाखांपर्यंतच्या या झोपड्यांचे दर हेच झोपडीदादा ठरवतात. झोपडी दुमजली किंवा तीन मजली असेल तर तिचा भाव दहा लाखांच्या वर जातो. झोपडी घेतल्यानंतर नळजोडणी, वीज व मालमत्ता कर नोंदणीही करून देण्याची हमी झोपडीदादा देतात. बेकायदा झोपडीविक्रीतून बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे ते कुठेही झोपड्या बांधून विकत आहेत. डोंगरावरील झाडे तोडूनही झोपड्या बांधल्या जात आहेत. नेरूळमधील एलपीजवळ रमेश मेटलच्या मागे आणि बेलापूरमधील सेक्‍टर २१ व २२ येथील बाल्तूबाई झोपडपट्टीत काही टोळ्यांकडून झोपड्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. 

सरकारने २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा गैरफायदा झोपडपट्टीदादा घेत आहेत. सध्या तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, ऐरोली, दिघा, पावणे एमआयडीसीच्या मागे, नेरूळमधील डोंगर, पारसिक हिल, आर्टिस्ट व्हिलेजच्या मागील डोंगर येथे  झोपडपट्ट्या वसल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या भागात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच झोपड्या होत्या; परंतु आता त्यांनी डोंगराचा बराचसा भाग व्यापला आहे.

कारवाईनंतर पुन्हा झोपड्या!
या बेकायदा झोपड्यांवर सिडको, महापालिका व एमआयडीसीकडून अनेकदा कारवाई केली जाते; परंतु त्यानंतर झोपडीदादा पुन्हा तेथे झोपड्या बांधतात. यामुळे त्यांना कोणाचाच धाक नसल्याचे दिसते. 
 
झोपड्यांचे दर (लाखांत)
तुर्भे नाका, स्टोअर
साधी झोपडी ः सात ते आठ
दोन किंवा तीन मजली ः १२ ते १४

Web Title: new mumbai slum dada