नवोदित-प्रस्थापित भेद संपावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

व्यक्त होताना माध्यमाचे भान हवे आणि स्थळ-कालाचे योग्य निरीक्षण व्हावे...

पु. भा. साहित्यनगरी, डोंबिवली - आजच्या कोलाहलात आपला आतला आवाज ऐकून व्यक्त होणे आणि प्रस्थापितांच्या कोंडीतून तो रसिकांपर्यंत पोहचवणे हे आव्हान असून, सच्चा आवाज सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवोदित आणि प्रस्थापितांमधील भेद संपायला हवा, असे मत नवोदित लेखक मेळाव्यात व्यक्त झाले.   

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात ‘नवोदित लेखन आणि लेखक’ या विषयाला वाहिलेला नवोदित लेखक मेळावा झाला. दोन चर्चासत्रांतून त्यांनी आपला आवाज सच्च्या रसिकांपर्यंत पोहचवला आणि त्यानंतर झालेल्या नवोदित कवींच्या कविसंमेलनातून त्यांनी आपल्या नवोन्मेषशाली प्रतिभेच दर्शन घडवले. 

‘नवोदित लेखन ः आव्हाने आणि अपेक्षा’ या नवोदित लेखक मेळाव्यातील पहिल्या चर्चासत्रात मनस्विनी लता रवींद्र, रवी कोरडे, प्रशांत आर्वे, घनश्‍याम पाटील हे नवोदितांचे प्रतिनिधित्व करणारे लेखक सहभागी झाले होते. या चर्चेत सचिन केतकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. चर्चासत्रात सहभागी लेखकांनी नवोदित लेखकांना आशादायी ठरतील, असे मुद्दे नेमकेपणाने मांडले. चर्चासत्रात रवी कोरडे म्हणाले, की नवोदित लेखकांचे सुरुवातीचे लेखन हे अनुकरणातून लिहिलेले असते; पण त्यापुढील लेखन करताना मात्र लेखकांनी त्याच प्रभावात अडकून न राहता स्वतःची वेगळी शैली निर्माण केली पाहिजे.

याच मुद्द्याला पुढे घेऊन जाताना मनस्विनी लता रवींद्र म्हणाल्या, की सर्व स्तरातील लेखकांचा आपापसात संवाद वाढला पाहिजे. प्रत्येकाला व्यक्त व्हायची संधी मिळाली पाहिजे. आणि आजचा लेखक लेखनाच्या माध्यमामुळे स्वयंपूर्ण झाला पाहिजे. त्याचे लेखन हाच त्याचा व्यवसाय झाला पाहिजे. घनश्‍याम पाटील यांनी, प्रकाशक आणि लेखक यांचे नाते निकोप असले पाहिजे आणि नवोदित लेखकांनी आपले लेखन कुणा जाणकार व्यक्तीकडून तपासून घेतले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रशांत आर्वे म्हणाले, की बदलत्या काळाची गुंतागुंत टिपणारे लेखक हवे आहेत. त्यांनी देशाटन केले पाहिजे. नवे अनुभव घेतले पाहिजेत. कुठल्याही झुंडशाहीच्या प्रभावाला बळी पडता कामा नये. मुळात आजच्या लेखकांची चिंतनशीलता कमी पडते म्हणून त्यांचे लिहिलेले साहित्य हा वरवरचा तवंग वाटतो. 

एकंदरीत आजच्या साहित्यात काय दिसते, तर ते प्रस्थापितांचे प्रस्थ आणि नवोदितांचा आवाज दाबला जातो. त्यांच्या साहित्यावर मत प्रदर्शित न करणे, त्यांना प्रोत्साहन न देणे हा सर्वात मोठा धोका आहे. नव्या लेखकांना आजुबाजूच्या कोलाहलात व्यक्त होणे हेच मोठे आव्हान आहे. असा सूर चर्चेतून आला. लेखकांनी त्यांची प्रयोगशीलता जपली पाहिजे. लेखन ही वाचकाला आणि लेखकालाही माणूस बनवणारी प्रक्रिया आहे. मराठी भाषेतील साहित्य जगभरात पोहचले पाहिजे, या मुद्द्यापर्यंत सखोल चर्चा झाली.

Web Title: new old writers