नव्या प्रसाधनगृहांची दुरवस्था    

नव्या प्रसाधनगृहांची दुरवस्था    

बेलापूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉल सामन्यांच्या वेळी नवी मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची साफसफाई केली जात नसल्याने तेथे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात २०१७ मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशात आठवा; तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. या सर्वेक्षणाला सामोरे जाताना महापालिकेने स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालये, ई-टॉयलेट, शी-टॉयलेट असे विविध उपक्रम राबवले होते. त्यामुळे शहर स्वच्छ झाले होते. ऑक्‍टोबर २०१७ मध्ये १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप सामन्यांमुळे नवी मुंबईला यजमान म्हणून मान मिळाला होता. या सामन्यांमुळे शहरात येणाऱ्या नागरिकांवर छाप पडावी; तसेच शहराबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी महापालिकेने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम परिसर, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, सायन-पनवेल महामार्गालगत वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, उरण फाटा, पाम बीच मार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, चौक अशा सर्वच ठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी केली होती. मोकळ्या जागा, रस्तादुभाजक, सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा, नेरूळ एलपी, सानपाडा रेल्वेस्थानक, वाशी गाव, वाशी शिवाजी चौक, तुर्भे अशा अनेक ठिकाणी लहान उद्याने तयार केली होती. या वेळी नेरूळमध्ये प्रसाधनगृहे बनवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या निमित्ताने शहरात स्वच्छता ठेवली होती. यात घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबईला देशात सर्वोत्तम स्थान मिळाले. परंतु ही स्पर्धा संपल्यावर कोट्यवधीचा खर्च करून शहरात राबवलेल्या उपक्रमांकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रुग्णालय परिसरात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली आहे. या प्रसाधनगृहांची स्वच्छता होत नसल्याने नागरिकही त्यांचा वापर करण्याचे टाळतात. यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपुरताच देखावा केला होता का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ फिफाच्या काळात नागरिकांच्या सोईसाठी जास्त प्रमाणात प्रसाधनगृहे, ई-टॉयलेट बसवण्यात आले होते. सध्या या प्रसाधनगृहांचा वापर कमी होत असल्याने तेथून ती स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. नेरूळ विभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबतच्या सूचना दिल्या जातील.
- तुषार पवार, पालिका उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com