स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत "स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे' हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात, तर सर्वांत शेवटी मुंबईमध्ये होतो. या दोन जिल्ह्यांतील नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अर्थात सूर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढून ती महासंचालनालयाकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरिक यांनी गोंदिया आणि मुंबईतील नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून ती कल्पक अशा फोटोओळीसह पाठवावीत. पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याची सोय करण्यात येईल. निवडक छायाचित्रांना शासनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच, एमटीडीसीच्या देशविदेशात नेण्यात येणाऱ्या प्रसिद्धी सामग्रीत या छायाचित्रांचा समावेश करण्यात येईल. छायाचित्रे dgiprsocialmedia@gmail.com या ईमेलवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: New Year Celebration Sun Rays Photo