
Ravindra Dhangekar: आमदार धंगेकर अन् जगताप अधिवेशनात लावणार हजेरी! 'या' दिवशी होणार शपथविधी
Pune News : अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर आणि आश्विनी जगताप हे लवकरच विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.
त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे. शपथविधी पार पडल्यानंतर हे दोघेही आमदार सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही हजेरी लावणार आहेत.
आमदार रविंद्र धंगेकर आणि आश्विनी जगताप यांचा शपथविधी ९ मार्च रोजी पार पडणार आहे. विधीमंडळातील सभागृहात त्यांचा शपथविधी सोहळा होईल. यानंतर हे दोघेही नवनिर्वाचित आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप या दोन्ही भाजपच्या आमदारांचं निधन झाल्यानं या ठिकाणी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली.
या दोन्ही निवडणूका बिनविरोध झाल्या नाहीत. त्यामुळं या दोन्ही निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेनेनं यामध्ये जोरदार प्रचार केला.
या निवडणुकीत भाजपनं कसब्याची जागा गमावली पण चिंचवडची जागा राखली. चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार नाना काटे यांचा आश्विनी जगताप यांनी पराभव केला. राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळं काटेंना फटका बसला आहे.