बीडीडी पुनर्विकास प्रकल्पास वेग 

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पास वेग 
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पास वेग 

मुंबई :  राष्ट्रपती राजवटीचा बीडीडी पुनर्विकास प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नाही, प्रकल्प येत्या महिन्यापासून अत्यंत वेगाने कार्यान्वित होईल, असा विश्‍वास म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केला. बीडीडी चाळ पुनर्विकास समितीसोबत म्हाडाचे सभापती आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक नुकतीच पार पडली. 

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या दीड महिन्यात सुरुवात होईल. त्यासाठी रहिवाशांचे स्थलांतर वेगाने करण्यात येईल. ज्या रहिवाशांची आणि स्टॉलधारकांची पात्रता निश्‍चित झालेली नाही त्यांची पात्रता येत्या पंधरा दिवसांत निश्‍चित करून, पात्रता यादी जाहीर केल्या जातील, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहे. 

वारसा नोंदी आणि ग्रामस्थांच्या खोल्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. या रहिवाशांनाही स्थलांतरित करण्याचे आदेश सभापतींनी यावेळी म्हाडा प्रशासनाला दिले. संक्रमण शिबिरातील वीजबिल देयकांचा प्रश्‍न सोडवण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हाडा कलम ९५- अ कायद्याबाबतच्या सुनावण्या लवकरच निकाली काढल्या जातील व येत्या महिनाभरात कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे मधू चव्हाण यांनी सांगितले. 

भारत मिल येथील संक्रमण शिबिराला लवकरच प्रत्यक्ष भेट देणार असून, तेथील स्थानिकांच्या किरकोळ समस्या सोडवण्याचे आश्‍वासनही म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी बैठकीत दिले. संक्रमण शिबिरात गेलेल्या आणि संक्रमण शिबिरात जाणार असलेल्या रहिवाशांच्या मनातील शंका दूर करण्यात आल्याचे बीडीडी चाळ पुनर्विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

...तर राखीव सदनिका रद्द
संक्रमण शिबिराचा करारनामा केलेल्या रहिवाशांना तातडीने स्थलांतरित केले जाणार असून, जे रहिवासी करारनामा करूनही स्थलांतरित झाले नाहीत, अशा रहिवाशांच्या संक्रमण शिबिरातील राखीव सदनिका रद्द केल्या जातील व नव्याने नोंदणी झालेल्या इच्छुकांना या सदनिका तातडीने देण्यात येतील, असा महत्त्वाचा निर्णय बैठकीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com