बेस्टचा "खासगी' मार्ग मोकळा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

बेस्टसाठी भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्याबाबत न्यायालयातील दावा मागे घेण्यास मंगळवारी (ता. 11) बेस्ट कामगार कृती समितीने संमती देऊन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे बस खरेदीचा पर्यायाने खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. बेस्टच्या ताफ्यात 450 बस लवकरच दाखल होणार आहेत.

मुंबई -  बेस्टसाठी भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्याबाबत न्यायालयातील दावा मागे घेण्यास मंगळवारी (ता. 11) बेस्ट कामगार कृती समितीने संमती देऊन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे बस खरेदीचा पर्यायाने खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. बेस्टच्या ताफ्यात 450 बस लवकरच दाखल होणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांना संपूर्ण संरक्षण आणि थकीत देणी तातडीने देण्याबाबत सामंजस्य करारात मान्य केल्याचे समजते. 

बेस्ट भवनात मंगळवारी बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती आणि बेस्ट प्रशासन यांच्यात बेस्ट बस भाडेतत्त्वावर घेण्याचा करार झाला. एप्रिल 2007 पासून भरती झालेल्या कामगारांना 10 टप्प्यांतील वाढ मेमधील पगारात देणे, कामगार करारासाठी वाटाघाटी, बेस्ट उपक्रमास झालेला तोटा पालिका भरून देणार आदी मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मांडल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या बस आणि कर्मचारी कायम राहणार, भंगारात जाणाऱ्या बसऐवजी नव्याने बस खरेदीसाठी पालिका खर्च देणार, निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी सप्टेंबरपर्यंत दिली जातील, जानेवारी आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार नाही आदी महत्त्वाचे मुद्दे पालिकेने मान्य केल्याचे आयुक्तांचे पत्र आणि इतर गोष्टींचा समावेश असलेला सामंजस्य करार करण्यात आला. 

यासंदर्भात कामगार कृती समितीतर्फे परळ येथे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात अनुकूलता दर्शवण्यात आली होती. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बसमध्ये चालक खासगी असेल; मात्र वाहक बेस्टचा कर्मचारी असेल. एसटीनेही शिवशाही बससाठी अशीच पद्धत अवलंबली आहे. 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पालिकेने मागण्या केल्या आहेत. वाढीव पगार, वेतनकरार, थकीत देणी, कर्मचाऱ्यांना संरक्षण, बेस्टच्या मालकीतील बसची संख्या कायम राहणे आदी सर्व गोष्टी संमत झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर होईल. बेस्ट उपक्रमासह मुंबईकरांचेही हित साधले जाईल. 
- शशांक राव, कामगार कृती समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News buses will be available soon