फिफा महत्त्वाचे की आरोग्य? 

फिफा महत्त्वाचे की आरोग्य? 

नवी मुंबई  - महापालिका प्रशासनाला फिफा महत्त्वाचे वाटते की नागरिकांचे आरोग्य? अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक देविदास हांडे-पाटील यांनी प्रशासनाला खडसावले. कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालयाची इमारत धोकादायक घोषित केल्यानंतर त्याच्या पर्यायी व्यवस्थेचे महापालिकेने काय केले? याबाबत हांडे-पाटील यांनी मंगळवारी महासभेत लक्षवेधी मांडली होती. कामकाजाच्या सुरुवातीलाच त्यांना महापौर सुधाकर सोनवणे यांनी बोलण्याची अनुमती न दिल्याने त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. त्यांना बोलण्याची परवानगी मिळावी म्हणून विरोधकांनी आग्रह धरला. 

कोपरखैरणे येथे सिडकोच्या जुन्या इमारतीमध्ये महापालिकेचे माता बाल रुग्णालय अनेक वर्षांपासून सुरू होते, परंतु त्या इमारतीची दुरवस्था झाल्याने 2004 मध्ये बापूजी कन्सल्टन्टने केलेल्या बांधकाम परीक्षणात धोकादायक म्हणून घोषित केली होती. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या इमारतीची पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा या इमारतीचे परीक्षण करण्यात आले. तेव्हा श्‍यामलाल जैन यांच्या संस्थेने केलेल्या परीक्षणात इमारत दुरुस्त करून वापरण्याजोगी असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे मुंढेंनी ही इमारत पाडण्याऐवजी दुरुस्त करण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु महासभेने तो प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आजपर्यंत रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्‍न अधांतरी आहे. यावर नगरसेवक देविदास हांडे-पाटील यांनी सभेत लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. कोपरखैरणेतील माता बाल रुग्णालयाच्या इमारतीचे प्रशासनाला नेमके काय करायचे आहे, असा संतप्त प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. रुग्णालयाअभवी गरोदर माता व वयोवृद्ध रुग्णांची हेळसांड होत आहे. खासगी रुग्णालयांकडून गरीब रुग्णांची लूट सुरू आहे. याला महापालिका प्रशासन व आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी तुर्भे माताबाल रुग्णालयाच्या इमारतीच्या विकासाचाही मुद्दा निघाला. ही इमारत तात्पुरती दुरुस्त करणार असल्याची माहिती आयुक्त एन. रामास्वामी यांनी दिली; तर कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालयाची इमारत पूर्णपणे पाडून टाकण्यात येणार आहे. तसेच त्याबदल्यात रुग्णांना सुविधा देण्यासाठी पर्यायी जागेचा प्रशासनाकडून शोध सुरू असल्याचे रामास्वामी यांनी सांगितले. 

जैन यांना पॅनेलवरून हटवा 
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी जैन यांना महापालिकेच्या पॅनेलवरून काढून टाकण्याची मागणी प्रशासनाकडे केली. महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या वकिलांना काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मग असे तकलादू अहवाल देणाऱ्या जैन यांना का ठेवले, असा सवाल त्यांनी विचारला. येत्या पुढच्या सभेत जैन याची हकालपट्टी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा चौगुले यांनी दिला. 

महापौर - नरबागे यांच्यात चकमक 
रुग्णालयाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुरेखा नरबागे यासुद्धा बोलण्यासाठी उभ्या राहिल्या; मात्र महापौर सुधाकर सोनवणे यांनी त्यांना बोलण्यास अनुमती न दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सोनवणे यांनी बोलूनसुद्धा नगबागे बोलण्याचे बंद न झाल्याने खाली बसा अन्यथा सभागृहाबाहेर पाठवून देऊ असे सोनवणे यांनी नगरबागे यांना खडसावले. त्या वेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी जागेवर उभे राहून सोनवणे यांच्याकडून महिला नगरसेविकेवर दबाव टाकण्याबद्दल विचारले. महापौरपदाचे दोन महिने उरले आहेत; आता तरी नगरसेवकांसोबत चांगले वागा असे त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com