निधी चौधरी यांची मंत्रालयात बदली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जून 2019

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्‌वीट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची आज सरकारने तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली.

मुंबई - महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्‌वीट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची आज सरकारने तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली. 

बदली करण्यापूर्वी निधी चौधरी या मुंबई महानगरपालिकेत उपायुक्‍त या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या वादग्रस्त ट्‌वीटमुळे त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी राजकीय पक्षाकडून केली जात होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या चौधरी २०१२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी १७ मे रोजी महात्मा गांधी यांच्याविषयी ट्‌वीट केले. याबाबत समाज माध्यमात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी ते ट्‌वीट काढून टाकले. तसेच आपल्या विधानाचा विपर्यास केला, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारने त्यांची बदली मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिव या पदावर केली आहे. त्यांच्यावरील कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nidhi chaudhary transfer to mantralaya