
Mumbai News : नायजेरियन नागरिकाचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला...
मुंबई : अंमलीपदार्थ तस्करीबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर नायजेरियन नागरिकाने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार मोहम्मद अली रोड परिसरात घडला.पोलीस उपनिरीक्षक दीपक घोरपडे असे जखमी पोलीसांचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात पोलिसाच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पायधुनी पोलिसांनी आरोपीला अटक केली.हेन्री देहचिडू बेम असे अटक नायजेरीयन आरोपीचे नाव आहे.
पायधुनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक घोरपडे कार्यरत असून घोरपडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम 353, 333 व 332 अंतर्गत पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायधुनी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्रपाळीत घोरपडे कार्यरत होते.
अंमलीपदार्थ विक्रीबाबत आलेल्या दूरध्वनीची शाहनिशा करण्यासाठी घोरपडे मोहम्मद अली रोडवरील धोबी स्ट्रीट परिसरात गेले होते. याबाबत त्यांनी आरोपी हेन्री देहचिडू बेम याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी आरोपी बेमने चाकूने पोलिसांवर हल्ला केला.
या हल्ल्यात घोरपडे यांच्या डाव्या हाताला जखम झाली. हल्ल्या होताच इतर पोलिसही पुढे सरसावले असता आरोपीने त्यांनाही धमकावले. हल्ल्यानंतर घोरपडे यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
याप्रकरणी घोरपडे यांच्या तक्रारीवरू गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पायधुनी पोलिसांनी आरोपी बेमला अटक केली. बेम अमन हॉटेलसमोर वास्तव्याला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपीच्या अंमलीपदार्थ तस्करीतील सहभागाबाबतही पोलीस तपास करीत आहेत