राजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

ठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच नीलेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केले, अशी माहिती ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी मंगळवारी दिली. 

ठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच नीलेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केले, अशी माहिती ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी मंगळवारी दिली. 

नीलेश राणे यांनी सोमवारी शिवसेनेवर केलेल्या आरोपांनंतर ठाण्यातील शिवसैनिकांत मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर म्हस्के यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नीलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, नीलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे नारायण राणे यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार दिसून येत आहेत. शिवसैनिक आजदेखील नारायण राणे यांच्याबाबत बोलताना नेहमी आदराने बोलतो; पण मुलांपुढे काही चालत नसल्याने राणे हे बॅकफूटवर गेले आहेत. आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या वेळेस राणे साहेबच सर्वांत शेवटी त्यांना भेटले होते, याचा विसर कदाचित नीलेश राणे यांना झाला असावा. हे सत्य जर त्यांना माहीत होते तर ते इतके दिवस गप्प का बसले, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. केवळ प्रसिद्धीसाठी केलेल्या त्यांच्या या वक्तव्यामुळे लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. एकीकडे नारायण राणे बाळासाहेब ठाकरे देव असल्याचे सांगत असताना त्यांची मुले मात्र त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी खटाटोप करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

दिघे कुटुंबीयांकडूनही नाराजी
नीलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नीलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत. निवडणुकीच्या वेळेस उगाच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे केदार यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Nilesh Rane blames allegations of political unrest