नऊ वर्षांच्या अद्वैतची "माऊंट किलीमांजारो'वर स्वारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

वयाच्या नवव्या वर्षी "माऊंट किलीमांजारो' सर करून अद्वैत भरतियाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे... 

मुंबई : वयाच्या सहाव्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे शिखर सर करणारा अद्वैत भरतिया भारतातील सर्वांत कमी वयाचा गिर्यारोहक ठरला होता. आता वयाच्या नवव्या वर्षी "माऊंट किलीमांजारो' सर करून त्याने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अद्वैतने आई पायल भरतिया आणि मोहिमेचे लीडर समीर पथम यांच्या नेतृत्वाखाली मचामे मार्गाने ट्रेक सुरू केला आणि 31 जुलै 2019 रोजी तो तब्बल 18,652 फूट उंच वसलेल्या माऊंट किलीमांजारोच्या अतिउच्च शिखरावर पोहोचला. 

अगदी कमी हवेचा दाब, समुद्रसपाटीपेक्षा 50 टक्के कमी ऑक्‍सिजनचा पुरवठा आणि 21 ते उणे 25 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करीत अद्वैतने अद्वितीय कामगिरी केली. अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी अद्वैतला दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. रोज एक तास पोहणे, त्यानंतर फुटबॉल, क्रिकेट अन्‌ टेनिससारखे दमछाक करणारे खेळ खेळणे, 100 मजले चढणे आणि पार्कमध्ये रोजचा सराव अशी अद्वैतची दिनचर्या होती. 

सौंदर्य थक्क करणारे! 
माऊंट किलीमांजारो सर करण्याचा अनुभव सांगताना अद्वैत म्हणाला, की ट्रेक आव्हानात्मक असल्यानेच तो करायला मजा आली. मी आपल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प शिखर मोहिमेच्या वेळी लाकडाच्या घरात राहत होतो; परंतु माऊंट किलीमांजारोच्या वेळी आम्ही तंबूत राहिलो. मी हा ट्रेक अजून लवकर पूर्ण करू शकलो असतो; पण हे शिखर इतके सुंदर होते की मी काही ठिकाणी थांबून सौंदर्य न्याहाळत बसलो. आता पुढच्या वर्षी माऊंट एलब्रस सर करण्याची तयारी सुरू आहे. परंतु, सध्याचा वेळ शाळेसाठी राखून ठेवला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine-year-old Advait Bhartiya mounted Mount Kilimanjaro