नीरव मोदीच्या घरावर ईडी, सीबीआयचे छापे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

केंद्रीय तपास यंत्रणांनी मनी लॉंडरिंगप्रकरणी नीरव मोदी व "गीतांजली जेम्स'चा मुख्य मेहुल चोक्‍सी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परदेशात असलेल्या नीरव मोदी व चोक्‍सी यांचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदीच्या मुंबईतील "समुद्र महाल' या घरावर ईडी व सीबीआयने कारवाई केली. गुरुवारपासून (ता. 22) दोन्ही यंत्रणांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यात महागडी घड्याळे, एक अंगठी व चित्रे जप्त करण्यात आली आहेत. 

नीरव मोदी परदेशात पळून गेल्यानंतर देशभरात विविध ठिकाणच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. अब्जाधीश असलेल्या नीरवचे वरळी परिसरात "समुद्र महाल' हे आलिशान घर आहे. त्या घरावर गुरुवारपासून ईडी व सीबीआयने संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत 15 कोटींची अँटिक ज्वेलरी, एक कोटी चार लाखांचे घड्याळ, तसेच 10 कोटींचे अमरित शेर गिल, एम. एफ. हुसेन या ख्यातनाम चित्रकारांनी काढलेली चित्रे दोन्ही तपास यंत्रणांनी पीएमपीएल कायद्याखाली ताब्यात घेतली. दोन्ही यंत्रणांचा तपास आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे समजते. 

7,638 कोटींचा ऐवज जप्त 

केंद्रीय तपास यंत्रणांनी मनी लॉंडरिंगप्रकरणी नीरव मोदी व "गीतांजली जेम्स'चा मुख्य मेहुल चोक्‍सी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परदेशात असलेल्या नीरव मोदी व चोक्‍सी यांचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. मोदीच्या शोधाकरता ईडीने इंटरपोलला ग्लोबल अरेस्ट वॉरंटसाठी कळवल्याचे समजते. त्यातच ईडीच्या विनंतीवरून मुंबईतील विशेष न्यायालयाने त्या दोघांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तपास यंत्रणांनी नीरव मोदीशी संबंधित असलेल्या देशभरातील 251 ठिकाणी कारवाई केली होती. तपास यंत्रणांनी आतापर्यंत याबाबत सात हजार 638 कोटींचा ऐवज जप्त केला आहे. 
 

Web Title: Nirav Modi House ED CBI Raids valuable things has seized