मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यासह तिघांना १५ जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश बुधवारी विशेष न्यायालयाने दिले. गैरहजर राहिल्यास त्यांना फरारी आरोपी घोषित केले जाईल, अशी ताकीदही विशेष न्यायालयाने दिली.
नीरव मोदी, त्याचा निकटवर्ती नीशल मोदी आणि सुभाष परब यांच्याविरोधात विशेष सीबीआय न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी बुधवारी समन्स जारी केले. जानेवारीच्या मध्यापर्यंत या तिघांनीही न्यायालयात हजेरी लावावी, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले.
आरोपींना हजेरी न लावल्यास त्यांना फरारी घोषित केले जाईल. कायद्यानुसार फरारी घोषित केलेल्या आरोपीच्या मालमत्तेवर तपास यंत्रणा कारवाई करू शकतात.
दरम्यान, पीएमएलए न्यायालयही मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याबाबत गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.
पीएमएलए न्यायालयात सक्तवसुली संचालनालयाने मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे. पीएनबीमधील सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.