
Nirmala Sitharaman : शेअर बाजार योग्यप्रकारे नियंत्रित; निर्मला सीतारामन
मुंबई : ‘देशातील शेअर बाजार योग्यप्रकारे नियंत्रित आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या शेअर बाजारावरील विश्वासावर अदानी समूहाच्या शेअरमधील जोरदार घसरणीचा किंवा समूहाबद्दलच्या वादाचा परिणाम होणार नाही, ’असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या स्फोटक अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १२० अब्ज डॉलरने घसरले असून, ते समूहाच्या एकूण मूल्याच्या जवळपास निम्मे आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले प्रतिपादन महत्त्वाचे मानले जात आहे.
‘‘भारत हा एक सुशासित देश असून, येथील भांडवली बाजारही उत्तमप्रकारे नियमन केलेले आहेत. एका उदाहरणावरून जागतिक स्तरावर गदारोळ केला जात असला, तरी त्यावरून भारतीय बाजारांचे मूल्यमापन केले जाऊ शकत नाही, ’’ असेही सीतारामन यांनी नमूद केले.
सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांनी अदानी समूहाला दिलेली कर्जे मर्यादीत असल्याचे त्यांनी झाले आहे, त्यामुळे अदानी समूहाचे शेअर कोसळले तरी या संस्थावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. गुंतवणूकदारांचा विश्वास यापुढेही कायम राहील, अशा खात्री वाटते,’’ असेही सीतारामन यांनी ठामपणे सांगितले.
हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाने करचोरी केल्याचा आणि कृत्रिमरीत्या शेअरच्या किमती वाढविल्याचा आरोप केला असून, आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा कार्पोरेट गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. तर अदानी समूहाने हिंडेनबर्ग अहवालाला निराधार आणि तथ्यहीन म्हटले आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयानेदेखील हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे, असा दावाही अदानी समूहाने केला आहे.
डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटीतून अदानी बाहेर
नवी दिल्ली ः अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सवरून अदानी एंटरप्रायझेसला सात फेब्रुवारीपासून हटविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर देशांतर्गत ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ या दोन प्रमुख शेअर बाजारांनी अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या तीन कंपन्यांना अल्प कालावधीकरिता अतिरिक्त देखरेखीखाली (एएसएम) आणले आहे. या कारवाईअंतर्गत कंपन्यांवर विविध निकषांच्या आधारे देखरेख ठेवली जाते. या कारवाईमुळे या शेअरमधील सट्टेबाजाराला आळा बसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अदानींची क्षमता घटण्याची शक्यता ः मूडीज
हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये लक्षणीय आणि अत्यंत वेगाने घसरण झाली आहे, त्यामुळे या कंपन्यांच्या एकूण आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करत असून, या प्रतिकूल घडामोडींमुळे पुढील एक-दोन वर्षांमध्ये कॅपेक्स किंवा कर्जफेडीसाठी भांडवल उभारण्याची समूहाची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने म्हटले आहे.