गडकरींचा मुंबई महापालिकेला प्रश्न; पावसाचे पाणी तुंबतेच कसे?

nitin gadkari
nitin gadkari

मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी म्हणाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोराई येथे खारफुटी उद्यानाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनेच्या आमदारांनी मात्र गडकरींची ही टिप्पणी शांतपणे ऐकून घेतली.

विदर्भात कचऱ्यावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या इंधनाचा वापर वाहन चालवण्यासाठी केला जातो. त्यामुळे लवकरच विदर्भातील सहा जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा दावा करत मुंबई पालिकेने बॅंकेतील ठेवी वापरून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारा, हे पाणी गुजरात आणि नाशिकच्या शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.गडकरी पुढे म्हणाले, ‘दिल्लीतील प्रदूषण २९ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यासाठी दिल्लीत वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. गंगेच्या उपनद्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. नागपुरात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वीज प्रकल्पांना विकले जाते, त्यातून उत्पन्नही मिळते. तसेच, कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या इंधनातून ४५० बसेसमध्ये ते वापरले जात आहे.

मुंबईचा समुद्र हा सुंदरच असायला हवा, कचऱ्यावर प्रक्रिया करून मिथेन, कार्बनडाय ऑक्‍साईडसारखे वायू मिळू शकतील. त्याचा वापर इंधन म्हणून करता येईल. मुंबईनेही याचा विचार करायला हवा. मुंबईत नागरी प्रश्‍नांवर भर द्यायला हवा, असे गडकरी यांनी नमूद केले.

कोरा केंद्रातील लघुउद्योगांसाठी १०० कोटी 
बोरिवली येथील खादीग्राम उद्योग विभागाच्या विकासालाही भर 
देण्यात येणार आहे. बोरिवली येथील कोरा केंद्राच्या १४० एकर जागेत रुग्णालय उभारण्यासाठी तसेच लघु उद्योगांना चालना देण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com