'नितीशकुमारांची भूमिका आरक्षण समर्थनाचीच'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल-पाटीदार, उत्तरेत जाट व गुज्जर यांची आंदोलने ही सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. शेतकरी समाजाच्या उद्‌ध्वस्तीकरणावर उत्तर न शोधले गेल्याने हे सारे शेतकरी समाज आरक्षण मागत आहेत. संपन्न मानले गेलेले समाज आड इतक्‍या विपन्नावस्थेला जावा ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मराठा-पाटीदार-जाट समाजातून होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले.

गेल्या रविवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश मेळाव्याचे उद्‌घाटन करताना नितीशकुमार यांनी आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली होती.

नितीशकुमार हे मराठा-पाटीदार-जाट आरक्षणाचे केवळ समर्थकच नव्हेत तर उद्‌गाते असल्याचे, पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी म्हटले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी केंद्र सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी या तिन्ही समाजांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली होती. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना हा निर्णय होणं आवश्‍यक असल्याचा आग्रह त्यांनी धरला होता, असे स्पष्टीकरण पाटील यांनी नितीशकुमार यांच्या भूमिकेविषयी बोलताना दिले.
नितीशकुमार यांच्या विवेचनानुसार जागतिकीकरणानंतर शेतकऱ्यांच्या मागे सरकारही उभे न राहिल्याने शेतीव्यवसाय संकटात आला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि आरक्षणाची मागणी ही त्याचीच प्रतिक्रिया असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांचा आग्रह स्वीकारला गेला असता तर मंडल निर्णयाच्या पाठोपाठ जाट, मराठा, पटेल यांच्या आरक्षणाचाही मुद्दा पंचवीस वर्षांपूर्वीच सुटला असता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: nitishkumar role for reservation support