एनएमएमटी आर्थिक संकटात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे. 

नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे. 

‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर एनएमएमटी नवी मुंबई शहरातील कानाकोपऱ्यासह मुंबई, ठाणे- कल्याण, डोंबिवलीपासून पनवेल-उरणपर्यंत सुरू आहे. या सेवेच्या ताफ्यात तब्बल ४०० बस आहेत. त्यांच्या एक हजार ८०० फेऱ्या होतात; पण आता ही सेवा अधिक आर्थिक संकटात सापडली आहे. सीएनजीपेक्षा डिझेलवर धावणाऱ्या बसवर होणारा खर्च हा डोकेदुखी ठरला आहे. या बससाठी दररोज २५ हजार लिटर डिझेल लागते. सहा महिन्यांपूर्वी डिझेलचे दर ५७ ते ५८ रुपये प्रति लिटर असताना दररोज १५ लाख खर्च येत होता. आता डिझेलचे दर ७८ रुपये प्रति लिटरच्या घरात पोहोचल्यामुळे दररोज २० लाखांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे महिन्याला तब्बल दीड कोटीचा अधिक भुर्दंड बसत आहे. त्याचबरोबर डिझेलवर धावणाऱ्या बसच्या देखभाल दुरुस्तीचाही खर्च अधिक असल्याने ७० ते ८० लाखांचा खर्च दुरुस्ती आणि सुटे भाग खरेदीवर होत आहे. या बिकट परिस्थितीतून सावरण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असतानाच काही मार्गांवरील फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामध्ये उलव्यातील फेऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या महिन्यात उलवे लोकल सुरू झाल्यामुळे एनएमएमटीला या भागातील फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळेही महिन्याचे लाखोंचे उत्पन्न बंद झाले आहे. हा सर्व खर्च भरून काढण्यासाठी महापालिकेने एनएमएमटीला ५० कोटींचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी परिवहन समिती सदस्य सुधीर पवार यांनी केली आहे. त्या मागणीला अन्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने संमत झाला आहे. 

महापालिकेने विविध कराद्वारे सुमारे तीन हजार कोटींच्या ठेवी बॅंकेत जमा केल्या आहेत. त्यापैकी काही रक्कम डबघाईत चालणाऱ्या एनएमएमटीला मिळावी, अशी मागणी परिवहन समितीमध्ये मंजूर केली आहे. पालिकेने मागणी मान्य केल्यास एनएमएमटीला संजीवनी मिळेल.
- सुधीर पवार, परिवहन समिती सदस्य

तातडीच्या मदतीची आवश्‍यकता
१० कोटींची थकबाकी कंत्राटदारांची आहे; तर सीएनजी खरेदीची ५ कोटी थकबाकी, सहाव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांची १० कोटींची थकबाकी आहे; डिझेल दरवाढीमुळे लागणारे अतिरिक्त १४ कोटी अशा ३९ कोटींची एनएमएमटीला तातडीची आवश्‍यकता आहे.

Web Title: NMMT in financial crisis