एनएमएमटीचे मोबाईल तिकीट

सुजित गायकवाड
शुक्रवार, 11 मे 2018

नवी मुंबई - आयटीएस (इंटलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर आधारित अद्ययावत नियंत्रण कक्ष तयार केल्यानंतर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रवाशांना मोबईलवर तिकीट मिळणार आहे. महापालिकेच्या ऑनलाईन सेवेतच तिचा समावेश असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेच्या अखेरीस ही सुविधा प्रवाशांना मिळण्याची शक्‍यता आहे.

एनएमएमटीच्या प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यास मदत व्हावी यासाठी महापालिकेने आयटीएस प्रणालीवर आधारित ॲप तयार केले आहे. त्यामुळे प्रवाशांना हव्या असलेल्या बसचे लोकेशन, बस थांब्यावर येण्याची वेळ, बस मार्ग अशी माहिती मिळत आहे; मात्र आता या सुविधांमध्ये बस तिकीट बुकिंगची आणखी एक सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना सहज तिकीट मिळेल; शिवाय त्याचे पैसे थेट एनएमएमटीच्या खात्यावर जमा होणार आहेत. प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे वाहकाबरोबर होणारे वाद यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना तिकीट देताना होणारी वाहकाची दमछाक थांबणार आहे.

असे तिकीट मिळेल

ॲप्समध्ये बस मार्ग पाहण्यासाठी ज्या पर्यायात जावे लागते, त्यातच तिकीट बुकिंगचा नवा पर्याय असेल. तो प्रवाशाने निवडल्यानंतर त्यांच्यासमोर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, माय वॉयलेट, एनएमएमटी मनी असे पेमेंटचे पर्याय मिळणार आहेत. त्यापैकी एक निवडून तिकिटाचे पैसे थेट एनएमएमटीच्या बॅंक खात्यावर जमा होतील आणि प्रवाशांना हवे असलेल्या मार्गावरचे तिकीट मोबाईलवर बारकोडसह मिळेल. बसमधील कंडक्‍टरला मोबाईलचे तिकीट दाखवल्यावर तो त्याच्या मशीनने ते स्कॅन केल्यावर एनएमएमटीच्या सर्व्हरला तिकीट बुक झाल्याचा संदेश मिळेल. हे तिकीट प्रवाशांना दोन तासांत प्रवास करण्यासाठी वैध असेल.

खर्चात बचत
एनएमएमटीच्या व्यवस्थापनाला तिकीट छापण्यासाठी वर्षाला २० ते ३० लाख खर्च करावे लागतात; मात्र मोबाईल तिकिटिंग सुरू झाल्यानंतर आणि त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास कागदाच्या तिकीट छापाईचा खर्च कमी होऊन एनएमएमटीची बचत होणार आहे.

Web Title: NMMT Mobile Ticket