एनएमएमटीची दरकपात तूर्तास लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेकडूनही (एनएमएमटी) दरकपात करण्याचा विचार सुरू होता. मात्र, तूर्तास तरी ही दरकपात पुढे ढकलण्यात आली आहे.

नवी मुंबई : बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेकडूनही (एनएमएमटी) दरकपात करण्याचा विचार सुरू होता. मात्र, दरकपात केल्यास आधीच महिन्याला होत असलेला पाच कोटींच्या तोट्यात आणखीन सव्वा कोटीची वाढ होण्याची भीती एनएमएमटी प्रशासनाला होती. त्यामुळे तूर्तास तरी तिकीट दरकपात करण्याचा विचार पुढे ढकलण्यात आला आहे. बेस्टने तिकीट दरकपात केल्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी आणखी काही वेगळे पर्याय चाचपडून पाहण्याचे एनएमएमटी प्रशासनाच्या विचाराधीन आहे. 

नागरिकांना बसणाऱ्या वाढत्या महागाईच्या झळा कमी करण्यासाठी ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेस्टच्या बसचे तिकीट अवघ्या पाच रुपयांवर आणल्याचा राजकीय निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, बेस्ट प्रशासनाला हा निर्णय काही अंशी महागात ठरत आहे. बेस्टने तिकीट दर कमी केल्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेवर झाला. बेस्टच्या दरकपातीमुळे एनएमएमटीची दरदिवशी 20 हजार प्रवाशांची घट झाली. त्यामुळे एनएमएमटीचे दिवसाचे 40 लाख रुपयांचे उत्पन्न, थेट 35 लाखांवर आले आहे. बेस्टच्या निर्णयामुळे एनएमएमटीला दिवसाला तब्बल पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

हा तोटा महिनाकाठी तब्बल सव्वा कोटीच्या घरात जात आहे. त्यामुळे एनएमएमटीतर्फेही बेस्टकडे वळलेले प्रवाशी आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तिकीट दरात कपात करण्याचा विचार सुरू होता. मात्र, तिकीट दर कमी केल्यास हा तोटा तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्‍यता एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांतर्फे वर्तवण्यात येत आहे. प्रवाशी वाढण्याच्या बेतात होणारा ज्यादा आर्थिक फटका एनएमएमटीला न परवडणारा आहे. 

बेस्टने तिकीट दरात कपात केल्यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नावर काही अंशी परिणाम झाला आहे. त्यामुळे तिकीट दर कपात करण्याऐवजी इतरही काही पर्याय चाचपडून पाहिले जाणार आहेत. तसेच आणखीन काही महिने प्रतीक्षा करून अभ्यास केला जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMMT rate decreasing Postponed