उन्हात नोटांसाठी वणवण!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे ठणठणाट
एटीएममधून पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यानंतर त्यावर अतिरिक्त चार्ज लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्याचा सपाटा नागरिकांना लावला आहे. एप्रिल महिन्याचे पगार झाल्यानंतर नोकरदारवर्गाने मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे काही बॅंकांचे म्हणणे आहे. 

ठाणे -  कॅशलेस व्यवहारातून होणाऱ्या फायद्याचा विचार करून बॅंकांच्या एटीएममधून नोटांचा पुरवठा नियंत्रित करण्याच्या प्रकारामुळे राष्ट्रीय आणि खासगी बॅंकांत नोटांची टंचाई पुन्हा जाणवत आहे. रणरणत्या उन्हात नागरिकांना पैशांसाठी वणवण करावी लागत आहे. ३१ मार्चनंतर सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे नोटांचा तुटवडा जाणवू लागला असून त्याचा ताण राष्ट्रीय आणि सहकारी बॅंकांवर आला आहे. शहरातील खासगी बॅंकांमधील अनेक एटीएम बंद  असून सुरू असणाऱ्या एटीएमवर गर्दी आहे. शहरातील सहकारी बॅंकांनी मात्र बॅंकेत येणाऱ्या सर्व ५०० च्या नोटा एटीएमसाठी राखून ठेवल्यामुळे चलनटंचाईच्या तक्रारी नसल्याचे सांगण्यात येत आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक वर्ष संपल्यानंतर बॅंकांना दोन दिवसांची सुट्टी होती. त्यानंतर रामनवमी, महावीर जयंतीच्या सुट्ट्या आल्यामुळे शहरातील बॅंका बंद होत्या. या सुट्टीच्या काळात बॅंकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे भरले गेले नसल्याने शहरामधील एटीएम मशीन बंद झाल्याचे दिसत आहे. नौपाड्याचा परिसर, स्थानक परिसर, घोडबंदरचा भाग, वर्तकनगर, वागळे इस्टेट या भागांतील अनेक एटीएम बंद झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक खासगी बॅंकांमधील पैसे संपल्याने राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांसमोर झुंबड उडत आहे. नोटाबंदीच्या काळापेक्षा हे प्रमाण कमी असले, तरी त्याची तीव्रता उन्हामुळे अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  

नोटाबंदीपासून काही एटीएम बंदच
नोव्हेंबर महिन्यात शहरातील शेकडो एटीएम पैशांविना दोन महिन्यांहून अधिक काळ बंद होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते, असे वाटत असतानाच पुन्हा चलनतुटवडा जाणवू लागला आहे. या एटीएमपैकी काही एटीएम मशीन आजपर्यंत सुरूच झाल्या नसल्याचे नागरिक सांगत आहेत. या एटीएम मशीन पडून आहेत. अशा बंद एटीएमच्या समोरून चकरा मारण्यातच नागरिकांचा वेळ वाया जात आहे.  

बिघाडाचे शुक्‍लकाष्ठ...
नव्या नोटा एटीएममध्ये टाकण्यासाठी आवश्‍यक हार्डवेअरचे अपडेट करणाऱ्या अभियंत्यांची कमतरता सध्या बॅंकांमध्ये आहे. दोन हजार रुपयांसाठी अपडेशन केलेल्या मशीन सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहेत. तंत्रज्ञ मिळत नसल्यानेच अडचण येत असल्याचे काही बॅंकांचे म्हणणे आहे. 

कॅशलेस व्यवहारांमधून मिळणाऱ्या कमिशनमुळे बॅंकांनी शहरातील कॅशलेस व्यवहारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी एटीएममधील पैशांचा पुरवठा कमी केला जात असून त्यातून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याने खासगी बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे मिळत नाहीत. नागरिकांची सर्व गर्दी राष्ट्रीयीकृत बॅंका आणि सहकारी बॅंकाच्या एटीएमकडे येत आहे. बॅंकांमध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांची संख्या कमी असल्याने त्या वेगाने पैसे टाकणे शक्‍य होत नाहीत. या टंचाईत सरकारी यंत्रणांचा सहभाग नसला, तरी तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे. 
- हेमल रवाणी, संचालक, दि कल्याण जनता सहकारी बॅंक.

देशभरात दोन लाख ३५ हजारांहून अधिक एटीएम आहेत. त्यांच्यात पैसे भरणाऱ्या खासगी वाहनांची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे एकाच दिवशी त्यांनी पैसे भरण्यास सुरुवात केल्यानंतर काही एटीएममधील पैसे त्याच दिवशी संपतात. त्या पुन्हा नव्याने भरण्यासाठी एक ते दोन दिवस लागल्यास तेथे टंचाई जाणवते. टीजेएसबी बॅंकेच्या एकूण १२७ शाखा असून १३५ एटीएम मशीन आहेत. बॅंकेकडे येणाऱ्या ५०० च्या नोटा एटीएममध्ये भरण्यासाठी वेगळ्या काढल्या जात असल्यामुळे टीजेएसबी बॅंकेच्या एटीएममध्ये नोटाटंचाईच्या तक्रारी आल्या नाहीत.
- सुनील साठे, व्यवस्थापकीय संचालक, टीजेएसबी सहकारी बॅंक लि. 

Web Title: No Cash in ATM