दादा! शिजवलेले जेवण नको,आता फक्त धान्य द्या! मजूरांची विनंती

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 30 April 2020

  • शिजवलेले खाद्यान्न नको,आता फक्त धान्य द्या!
  • निराधारांची स्वयंसेवी संस्थांना कळकळीची विनंती

 

वाशी : अडचणीच्या काळात पोटाची भूक भागवली, यासाठी धन्यवाद, पण एक महिन्यापासून एकच पदार्थ खाऊन प्रकृतीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे शिजवलेल्या अन्नाऐवजी आम्हाला कच्चे अन्नधान्य द्या, ते आम्ही शिजवून खाऊ, अशी कळकळीची विनंती मजूर, झोपडपट्टीतील निराधार आणि बांधकामस्थळी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनी त्यांच्याकडे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना केली आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक संस्थांकडून नवी मुंबईतील मजुरांच्या वस्त्या, शहरातील झोपडपट्टय़ा आणि बांधकामस्थळी अडकलेल्या परप्रांतीय मजूर यांना प्रथम अन्नाची पाकिटे वाटण्यात आली नंतर धान्याचेही वाटप केले. तब्बल एक महिनाभर पोलिस, नवी मुंबई पालिका आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने  हे काम करीत आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर, शिजवलेल्या अन्नामध्ये मसाले भात किंवा डालखिचडी या पलीकडे दुसरे पदार्थ नसते. त्यामुळे ते आता ’अन्न नको तर धान्य द्या’ अशी विनंती करीत आहेत. त्याऐवजी कच्चे धान्य दिल्यास मजुरांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचे अन्नपदार्थ शिजवता येतील, असे सांगितले.

निर्देश आलेत, लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा, जाणून घ्या प्रक्रिया.. 

शहराच्या विविध भागात परप्रांतीय बांधकाम अडकून पडले आहेत. चिचपाडा, यादव नगर, इलठण पाडा, तुर्भे या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये एका घरात दाटीवाटीने लोक राहतात. त्यांना सोशल डिस्टन्सिंगविषयी माहिती नाही,  याकडेही पालिकेने लक्ष दिले पाहिजे.
- राजा धनावडे, सामाजिक कार्यकर्ते

 

धान्याऐवजी अन्नवाटप सोयीचे
टाळेबंदीकाळात स्वंयसेवी संस्थांनी झोपडपट्टय़ांमध्ये कुटुंबनिहाय धान्यवाटप केले. मात्र याला मर्यादा होत्या. 100 किलो धान्य फक्त दहाच कुटुंबांना वाटल्या जात होते. मात्र एवढेच धान्य शिजवून त्यांचे पाकीटे वाटली तर त्याचा शेकडो लोकांना फायदा होऊ लागला. त्यामुळे संस्थांनी धान्याऐवजी अन्न वाटण्यावर भर दिला. मात्र अनेकदा अन्नाचा दर्जा निम्नस्वरूपाचा असल्याने व रोज एकच पदार्थ मिळू लागल्याने खाणाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No cooked food, Now just give the grain!