मोनोच्या स्थानकांत प्रवाशांची कुचंबणा

मोनोच्या स्थानकांत प्रवाशांची कुचंबणा

मुंबई - तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी मोनोरेल सेवा सुरू केली. प्रत्येक स्थानकात केवळ एक सामाईक स्वच्छतागृह असल्यामुळे विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. दरम्यान, स्वच्छतागृहांसाठी स्थानके व परिसरात जागाच नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. 

तब्बल १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मोनो रेल्वेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी दोन हजार ४६० कोटी रुपये खर्च झाले असले, तरी प्रवाशांसाठी स्वच्छतागृहासारखी सोय करताना एमएमआरडीएची कोंडी झाल्याचे दिसते. सरकते जिने, उद्‌वाहने आदी सुविधा मोनोच्या स्थानकांत आहेत. परंतु, या १७ स्थानकांत प्रत्येकी एकच स्वच्छतागृह असल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच पुरुष आणि महिला प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी एकच स्वच्छतागृह असल्यामुळे महिलांची अडचण होत आहे.

मोनो-२ मार्गावरून सध्या दररोज २५ हजार नागरिक प्रवास करतात. या प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याला प्राधान्यक्रम दिले जात आहे, अशी माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली. स्थानकांत सुरुवातीला बांधलेली स्वच्छतागृहे पूर्वी फक्त कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी होती. आता प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे ही स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली केली आहेत, असे त्यांनी सांगितले. 

सध्या दर २० ते ३० मिनिटांनी एक मोनो रेल्वे धावते; त्यामुळे प्रवाशांचा तितकासा ताण पडत नाही. प्रवासीसंख्या वाढल्यावर स्थानकातील एक स्वच्छतागृह अपुरे पडणार आहे. स्थानकात बाके नसल्यामुळे मोनोची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना उभेच राहावे लागते. 

अधिकारी म्हणतात, गरज नाही!
मोनो रेल्वेच्या स्थानकांची उभारणी बस थांब्याप्रमाणे असल्यामुळे स्वच्छतागृहाची गरज वाटत नाही, असे एमएमआरडीएतील एका अधिकाऱ्याने सांगितले. मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक स्थानके पदपथांवर बांधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या नसल्यामुळे स्वच्छतागृहे बांधल्यास सांडपाणी सोडायचे कुठे, असा प्रश्‍न असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com