मुंबईत मीटर वाढवणारी बटनवाली टॅक्‍सी नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

ताडदेव आरटीओंच्या तपासणीत खुलासा, एकही सदोष मीटर आढळला नसल्याची माहिती

मुंबई : छुप्या बटनाच्या साह्याने टॅक्‍सीचे मीटर वाढवून प्रवाशांची लूट करणाऱ्या चालकांचा गोरखधंदा मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी नुकताच उघड केला. मात्र, त्यानंतर ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने राबवलेल्या दोन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईत एकही टॅक्‍सी बटनयुक्त असल्याचे आढळून आले नाही.

मनसे नेते नांदगावकर यांनी टॅक्‍सीचालक मीटरमध्ये एका बटणाद्वारे फेरफार करून भाडे वाढवत असल्याचा प्रकार फेसबुकच्या माध्यमातून समोर आणला होता. त्याची गंभीर दखल घेत मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी (ता. १६) टॅक्‍सींची तपासणी केली; मात्र तपासणीत एकही सदोष मीटर आढळला नाही, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तीन भरारी पथकांनी मुंबई सेंट्रल ते महालक्ष्मीपासून वडाळा टीटी आणि दादर येथे ५० हून अधिक टॅक्‍सींमधील मीटरची तपासणी केली. यादरम्यान एकही मीटर सदोष आढळला नाही. वडाळा आणि अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील भरारी पथकांनीही १०० हून अधिक टॅक्‍सींची तपासणी केली. मात्र सदोष मीटर असलेली एकही टॅक्‍सी निरीक्षणात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांनी माहिती द्यावी!
शहरातून उपनगरात येणाऱ्या टॅक्‍सींचीही तपासणी भरारी पथकांनी केली. मात्र, अद्याप तरी दोषी मीटर आढळलेले नाहीत. प्रवाशांनी दोषी मीटरबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तत्काळ प्रशासनाच्या १८००१२०८०४० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.

टॅक्‍सींमधील मीटर सदोष असल्याची माहिती मिळाल्याने तत्काळ भरारी पथकांना मीटर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपासून तपासणी सुरू झाली असून यापुढेही प्रशासनाची टॅक्‍सींवर करडी नजर असेल. तसेच ही मोहीम यापुढेही सुरूच राहील. 
- डॉ. रुपकुमार बेलसरे, ताडदेव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No faulty meter found in mumbai in rto checking