"शताब्दी'तील रुग्णांना  दूध मिळत नसल्याने नाराजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

चेंबूर - गोवंडीतील पालिकेच्या पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालयात रुग्णांना अनेक दिवसांपासून पिण्यास दूध मिळत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, दूधपुरवठा करणारी गाडी काही दिवसांपासून येत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

चेंबूर - गोवंडीतील पालिकेच्या पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालयात रुग्णांना अनेक दिवसांपासून पिण्यास दूध मिळत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, दूधपुरवठा करणारी गाडी काही दिवसांपासून येत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

गोवंडीतील 25 एकर जागेवर शताब्दी रुग्णालय वसलेले आहे. गोवंडी, शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ट्रॉम्बे, वाशी नाका, माहूल, चेंबूर, मानखुर्द, नेहरूनगर आदी भागांतील हजारो गरीब रुग्ण उपचाराकरिता तिथे येत असतात. रुग्णालयात अतिदक्षता विभाग, शस्त्र विभाग, महिला, पुरुष व लहान मुलांचा विभाग आणि प्रसूती विभाग आहे. उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णांना 15 दिवसांपासून पौष्टिक आहार असलेले दूध मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. रुग्णालयात इतरही समस्या भेडसावत आहेत. क्ष-किरण आणि एमआरए मशीन कधी सुरू असते तर कधी बंद असते. औषधांच्या गोळ्यांचा तुटवडाही असतो. मनुष्यबळ कमी असलेल्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी योग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना सायनमधील लोकमान्य टिळक किंवा राजावाडी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहेत. 

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीए आणि पालिका गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, माहुल, वाशी नाका आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करीत आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

सायन आणि केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर शताब्दी रुग्णालय सुपर स्पेशालिस्ट करावे. पालिकेने लवकरात लवकर रुग्णालयात कर्मचारीभरती करावी. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना पिण्यासाठी दूध द्यावे आदी मागण्या सामाजिक कार्यकर्ते राजू नगराळे आणि अशोक ठाकरे यांनी केल्या आहेत. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

डेअरीमधून दूधपुरवठा करणारी गाडी येत नसल्यामुळे सध्या शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना दूध मिळत नाही. त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. रुग्णांना दररोज चहा देण्यात येतो. रुग्णालयांत उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा देण्यात येते. 
- डॉ. अलका माने, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no milk for patients in shatabdi hospital

टॅग्स