बॅंकांमधून हवे तेवढे पैसे मिळेनात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

ठाणे - रिझर्व्ह बॅंकेने बॅंक खात्यातून हवे तेवढे पैसे काढण्याचे ग्राहकांना आवाहन केले असले, तरी बॅंकांमध्ये पुरेसे पैसेच नसल्यामुळे खातेदारांची अवघ्या पाच हजार रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यातही दोन हजार रुपयांच्या दोन नोटा व दहा 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्याने ग्राहक अडचणीत सापडत आहेत. अनेक तास रांगेत उभे राहून मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे सुटे कोण देणार, असा नागरिकांना प्रश्‍न पडत आहे. 

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 10 नोव्हेंबरपासून एटीएम केंद्रे सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर चार हजार रुपयांच्या नोटा बॅंकेतून बदलून देण्यात येणार होत्या. मात्र, दोन हजार व 100 च्या नोटा बॅंकांमध्ये नसल्यामुळे लाखो नागरिकांचे हाल झाले होते. तब्बल पंधरा दिवसांनंतरही बॅंकांमधील रांगा कमी होत नव्हत्या. तर बहुतांशी एटीएम केंद्रे बंदच होती. काही दिवसांनंतर बॅंकांच्या व्यवस्थापनाकडून खात्यात पैसे भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर धनादेशाद्वारे पैसे काढण्यास सांगण्यात आले होते; मात्र त्या वेळी मर्यादित रक्कमच खातेदारांना मिळत होती. या प्रकारामुळे खातेदारांचे हाल होत होते. 

या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला होता. ग्राहकांनी आपल्या खात्यातून हवे तेवढे पैसे काढावेत; मात्र ते 500 व दोन हजार रुपयांच्या नोटांमध्येच असतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र अद्यापि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकांमध्ये खातेदारांना गरजेएवढे पैसे उपलब्ध होत नाहीत. काही बॅंकांनी प्रवेशद्वारावर फलक लावला असून, बचत खातेदारांना केवळ पाच हजार रुपये व चालू खाते असलेल्या व्यापाऱ्यांना केवळ दहा हजार रुपये रोख देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचा आदेश हवेतच राहिला असून, खातेदारांची फरपट सुरूच आहे. 

कोअर बॅंकिंगही बंद 
इंटरनेटचे महाजाल सुरू झाल्यानंतर बॅंकिंग क्षेत्रात कोअर बॅंकिंग पद्धत लोकप्रिय झाली होती. कोणत्याही शाखेचे व्यवहार कोणत्याही शाखेतून करता येत होते. त्यामुळे नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थलांतर केलेल्या खातेदारांची सोय होत होती; मात्र काही बॅंकांनी कोअर बॅंकिंगद्वारे पैसे देणे पूर्णपणे थांबविले आहे. त्याचा फटका दररोज लाखो खातेदारांना बसत आहे.

Web Title: no money in bank