विद्यार्थ्यांचे सक्तीचे उपोषण

सुनील पाटकर
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

भोजनासाठी लागणारे अन्नधान्य आणि इतर साहित्य सरकार देते. पहिली ते आठवीपर्यंत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना हा आहार देण्यात येतो; परंतु महाड शहरातील पा. म. धरवळ कन्या विद्यालय आणि वामनराव गाडगीळ प्राथमिक शाळांचे सुमारे पाच हजार किलो अन्नधान्य भिजले आहे.

महाड : गेल्या आठवड्यात महाडमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर पूर आला. त्याचा फटका शालेय पोषण आहाराला बसला आहे. अनेक ठिकाणी त्यासाठी लागणारे साहित्य आणि धान्य भिजल्याने विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजन बंद झाले आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे सक्तीचे उपोषण सुरू आहे. 

ग्रामीण भागामध्ये शाळेतील मुलांची गळती थांबावी, यासाठी त्यांना दुपारच्या सुट्टीमध्ये पुरेसे उष्मांक देणारी मधान्ह भोजन योजना सरकारने सुरू केली आहे. या भोजनासाठी लागणारे अन्नधान्य आणि इतर साहित्य सरकार देते. पहिली ते आठवीपर्यंत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना हा आहार देण्यात येतो; परंतु महाड शहरातील पा. म. धरवळ कन्या विद्यालय आणि वामनराव गाडगीळ प्राथमिक शाळांचे सुमारे पाच हजार किलो अन्नधान्य भिजले आहे. औद्योगिक क्षेत्रातील टेमघर माध्यमिक शाळेचेही अन्नधान्य भिजले आहे. आकले येथील प्राथमिक शाळा, केंबुर्ली व उतेकर वाडीतील प्राथमिक शाळा या शाळांमधील शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य भिजले आहे. त्यामुळे पोषण आहाराअभावी तालुक्‍यातील शेकडो विद्यार्थ्यांचे सक्तीचे उपोषण सुरू झाले आहे. अनेक पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

शाळा हतबल 
विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी गहू, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, तेल, मसाले अशा प्रकारचे सामान सरकारकडून पुरवले जाते. आता हे सर्व सामान भिजून गेल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कुठून द्यायचा, हा मोठा प्रश्न शाळांपुढे उभा राहिलेला आहे. 

महाड तालुक्‍यातील शालेय पोषण आहाराचे साहित्य भिजलेले आहे. त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे तत्काळ कळविण्यात आलेली आहे. 
- प्रमोद गोडांबे, गटविकास अधिकारी, महाड 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No pet food