काँग्रेस-'राष्ट्रवादी' आघाडीत मिठाचा खडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : देशभरात भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना महाराष्ट्रात मात्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समन्वयात जागावाटपावरून मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची राज्यात पीछेहाट सुरू असताना लोकसभेच्या दोन जागांसाठीची पोटनिवडणूक व सहा जागांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत जागावाटपाचा तिढा कायम राहिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला सुनावल्यानंतर ज्या पक्षाने ज्या जागा लढवल्या त्या लढवण्यास काँग्रेस सहमत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केले. विधान परिषदेच्या अमरावती व बीड-लातूर-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा काँग्रेसने लढवल्या होत्या, असे सांगत चव्हाण यांनी या मतदारसंघांवरील दावा सोडता येणार नसल्याचे सूचित केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला लातूर-बीड-उस्मानाबादमधील संख्याबळानुसार हा मतदारसंघ हवा आहे. याच मतदारसंघावरून वाद असल्याचे चव्हाण म्हणाले. 

पालघर लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, भंडारा-गोंदिया हा लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून, खासदार नाना पटोले यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आघाडी धर्माच्या आजपर्यंतच्या सूत्रांनुसार विरोधी पक्षाचा जो विद्यमान आमदार अथवा खासदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येईल त्या पक्षाकडे संबधित मतदारसंघ दिला जाईल, असे धोरण आहे. त्यामुळे, भंडारा-गोंदियावर काँग्रेसने दावा केला आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचा असल्याने त्यावर पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे मानले जाते. 

नाना पटोले यांना लोकसभेची निवडणूक लढवायची असेल, तर त्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी घेतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

  • - काँग्रेस पालघर लोकसभा लढवणार 
  • - लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ 'राष्ट्रवादी'ला हवा 
  • - भंडारा-गोंदियाचा पेच कायम 
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No settlement yet between Congress and NCP over seat distribution