सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला चाप

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला चाप

नवी मुंबई - ‘शिक्षणाची पंढरी, स्वच्छ शहर’ असा लौकिक असलेल्या नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. त्याची दखल खुद्द नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दखल घेतली असून अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत ६५६ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर आणि खारघर या भागात सर्वाधिक शाळा आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यात ओळख होऊ लागली आहे. दुसरीकडे सायबर आणि कामाचा ताण असणारे उद्योगही या शहरात वाढू लागल्याने सिगारेट, पानमसाला, गुटखा यांसारख्या व्यसनांच्या आहारी येथील तरुणाई गेली आहे. या संदर्भातील तक्रारीही तरुणांनीच अधिक प्रमाणात केल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांपासून शंभर मीटरची हद्दीत धूम्रपानावर बंदी असतानाही नियम केव्हाच पायदळी तुडवले आहेत. शाळा व महाविद्यालयांपासून अगदी हाकेच्या अंतरावर टपऱ्या थाटून अनेकांनी तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटले आहे. त्यामुळेच संजयकुमार यांनी दोन्ही परिमंडळाच्या उपायुक्तांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा कोटपा - २००३’ नुसार शहरात कारवाई सुरू केली आहे. या कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलिस उपायुक्त तुषार दोषी यांच्यामार्फत सर्व पोलिस ठाण्यांना आदेश देण्यात आले आहेत. 

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २४ डिसेंबर २०१८ पासून २० पोलिस ठाण्यांनी धूम्रपानविरोधात सहभाग घेतला आहे. त्यानुसार ६५६ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कळंबोली पोलिस ठाण्याने जानेवारी २०१९ मध्ये ‘कोटपा कायदा कलम - ४’ नुसार २११ जणांवर कारवाई केली आहे. 

महाविद्यालये, शाळा यांच्या परिसरात थाटलेल्या टपऱ्यांवर सर्रासपणे धूम्रपान सुरू असल्याच्या तक्रारी काही महाविद्यालयीन तरुणांनी केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय पथके स्थापन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- संजयकुमार, पोलिस आयुक्त

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाई योग्य आहे. नेरूळ सेक्‍टर २ मध्ये वाईन शॉपसमोरच भर रस्त्यात काही जण मद्यपान करतात. याच भागातून महिला आणि तरुणींची ये-जा सुरू असते. शेजारीच शाळा आणि पिठाची गिरणी, दवाखाना आहे. याचाही विचार पोलिसांनी करावा. 
- विद्या भांडेकर, नोकरदार, नेरूळ

उघड्यावरील मद्यपानावर कारवाई कधी?
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यावरच मद्यपान केले जाते. त्यामध्ये सीबीडी-बेलापूर सेक्‍टर ११, नेरूळ रेल्वेस्थानकाजवळचे वाईन शॉपचा समावेश आहे. कोपरखैरणे व ऐरोली भागातील अनेक वाईन शॉपसमोरच अनेक जण उघड्यावरच मद्यपान करत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com